आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांची बारावी आणि पालकांनाच टेन्शन, काय आहे नेमके 'बारायण'मध्ये, सांगताय निर्मात्या दैवता पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - आपल्याला स्वतःचे बारावीचे वर्ष नक्कीच आठवत असेल. बारावीत असताना परिक्षेचे टेन्शन, क्लासेसची धावपळ, शिक्षकांचे उपदेश आणि  या सर्वांपेक्षा आपल्या आई-वडिलांना असलेले टेन्शन हे ठरलेलेच. बारावीचे वर्ष म्हणजे जणू काही युद्धच असेच प्रत्येक घरात वातावरण असते. या गोष्टींना पु्न्हा उजाळा देण्यासाठी आला आहे 'बारायण' हा चित्रपट. आज 12 जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

 

'बारायण' चित्रपटाच्या निर्मात्या दैवता पाटील यांनी चित्रपटाबद्दल आमच्याशी खास संवाद साधला आणि चित्रपटाची कथा, संकल्पनेपासून त्यांच्या खासगी आयुष्यातील अनुभवही आमच्यासोबत शेअर केले आहेत. वाचा, 'बारायण'विषयी काय सांगताय दैवता पाटील..

 

'बारायण' चित्रपटाविषयी प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय खास पाहायला मिळेल?


"नावावरुनच सिनेमा बारावीचे शैक्षणिक वर्ष या विषयावर आहे. आतापर्यंत बरेच सिनेमे येऊन गेले जे मुलांचे शिक्षण या विषयावर होते. पण ह्या सिनेमाचे वेगळेपण हे आहे की हा शिक्षणपद्धती आणि शिक्षणप्रणालीबद्दन न बोलता या चित्रपटात पालकांच्या दृष्टीने त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक वर्षाबद्दल भाष्य करतो.पालक म्हणून बारावीच्या मुलांकडे कसे बघतो, आपले काय चुकते, आपण मुलांशी कसे वागतो हा प्रश्न प्रत्येक पालकाला हा चित्रपट पाहिल्यानंतर पडेल. मुलांच्या बारावीचे वर्ष आणि त्याबद्दल असणारा सामाजिक दृष्टीकोन बदलणेही तितकेच गरजेचे आहे. हे सर्व महत्त्वाचे विषय 'बारायण' चित्रपटात आपल्याला रंजक पद्धतीने पाहायला मिळणार आहेत. गंभीर विषयावर आपण गाणी, धम्माल, मस्ती हे सर्व करत कुठेतरी विचार करायलाही भाग पाडतो असा हा चित्रपट आहे. रटाळ संदेश न देता आपल्याला हा चित्रपट पाहताना नक्कीच फार मजा येईल." 
 
'बारायण' चित्रपटाची कथा कशी काय सुचली, काही खास कारण?


"हो, मी मुंबई युनिवर्सिटी जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर आहे त्यामुळे मागील 12 वर्षापासून शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टी मी फार जवळून अनुभवल्या आहेत. रोजचे विद्यार्थ्यांसोबतचे अनेक अनुभव या चित्रपटात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक सीन्स हे खरेखुरे घडलेले आहेत आणि आम्ही ते चित्रपटात टाकण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकांच्या घरीही त्यांचा भाचा बारावी पास झाल्यानंतर जी काही स्थिती होती त्याचाही या चित्रपटात खास मागोवा घेण्यात आला आहे. त्यातून हे कथानक सुचले आणि घराघरातील ही गोष्ट आम्ही सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला." 

 

चित्रपटात आहे मोठ-मोठ्या कलाकारांची पर्वणी पाहायला मिळत आहे, कास्टिंग कशी केली?

 
"जवळपास दीड वर्ष या चित्रपटाच्या कथेवर काम चालु होते आणि त्यानंतर एक वर्ष सिनेमा पूर्ण करण्यासाठी लागला. अडीच वर्ष या सिनेमावर काम केले. जेव्हा स्क्रिप्ट लिहीत होतो तेव्हाच या कलाकारांची नावे डोळ्यासमोर होती. अगदी लहान भूमिका असली तरी त्यासाठी मोठ्या कलाकारांनाच घेण्याचा आमचा प्रयत्न होते. अनुभवी कलाकारांचे काम बघताना एक वेगळेच समाधान प्रेक्षकांना मिळते आणि तेच समाधान देण्याचा आमचा प्रयत्न होता. सिनेमा संपल्यावर यातील फक्त मुख्य कलाकार नव्हे तर सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशी आम्हाला खात्री आहे."
 
चित्रपटातील मुख्य अभिनेता अनुराग वरळीकरची निवड कशी झाली?
"अनुराग वरळीकार याने बाल कलाकार म्हणून काम केले आहे. त्याने 'देवकी' नावाचा सिनेमा केला त्यातील कामासाठी त्याला बालकलाकाराचा राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर केलेल्या 'मिशन चॅम्पिअन' साठीही त्याला बालकलाकाराचा राज्य पुरस्कार मिळाला. अनुराग प्रथमच मुख्य अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे आणि या चित्रपटातील त्याचे काम वाखाणण्याजोगे आहे. अनुराग वयाने तसा मोठा आहे पण बॉडी, अभिनय यावर काम करत त्याने स्वतःला एका बारावीतील मुलाच्या भूमिकेत चपखलपणे बसवले आहे. प्रेक्षकांना त्याचे काम नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, बारायण चित्रपटाचे ऑन लोकेशन फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...