आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नील-गिरीजाची जमली जोडी, ‘काय झालं कळंना’ 20 जुलैला होणार प्रदर्शित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमाच्या पडद्यावर एखादी नवी जोडी आली की, त्याबाबत उत्सुकता वाढते. प्रथमच एकत्र येणाऱ्या नव्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहाण्याचं कुतूहल प्रेक्षकांनाही असतं. त्यामुळेच काही दिग्दर्शकही कथानकाचा मान राखत नवीन कलाकारांची जोडी जमवण्याला प्राधान्य देत असतात. ‘काय झालं कळंना’ या आगामी मराठी सिनेमातही अशीच एक नवी जोडी जमली आहे. ही जोडी आहे स्वप्नील काळे आणि गिरीजा प्रभू यांची...  प्रेम या सुंदर भावनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती पंकज गुप्ता या तरुण निर्मात्याने केली आहे. येत्या २० जुलैला ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

‘काय झालं कळंना’ या सिनेमातील कोणतीही गोष्ट मुद्दाम ठरवून केलेली नसून, कथानकाची गरज असल्याने करण्यात आल्याचं मत सुचिता यांनी व्यक्त केलं आहे. जे जे कथेसाठी गरजेचं होतं, ते ते करण्याचा प्रयत्न आपल्या टिमने केल्याचं सुचिता मानतात. मुख्य भूमिकेतील नवीन जोडीही त्याचाच एक भाग आहे. या सिनेमात कॅालेजवयीन तरुणाईची गोष्ट आहे. त्यामुळे त्याला न्याय देऊ शकणाऱ्या कलाकारांची गरज होती. मग ते नवखे असले तरी चालणार होतं. हेच लक्षात ठेवून स्वप्नील आणि गिरीजा यांची मुख्य भूमिकेसाठी निवड केल्याचं सुचिता म्हणतात. दिग्दर्शनासोबतच सिनेमाचं कथालेखनही सुचिता यांनीच केलं आहे. त्यावर किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी पटकथा रचली आहे. प्रेमाच्या गुलाबी नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात नवी कोरी जोडी पाहायला मिळणं हे प्रेक्षकांसाठीही उत्सुकतेचं ठरणारं आहे.

 

‘काय झालं कळंना’ च्या निमित्ताने प्रथमच कॅमेरा फेस करणारा स्वप्नील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला की, या सिनेमात मी शऱ्या नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. साधा, सरळमार्गी असलेल्या या मुलाचं कुटुंबही तितकंच साधं आहे. पदार्पणातच प्रेमकथेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असल्याचा एक वेगळाच आनंद आहे.

या सिनेमात गिरीजाने पल्लवी नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. याबाबत ती म्हणाली की, ही पल्लवी लहानशा गावात राहणारी आहे. शऱ्याप्रमाणेच साधी आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी आहे. शऱ्याचं एक सपोर्ट सिस्टीम तिच्या मागे असल्याने थोडी बिनधास्तही आहे. स्वप्नीलसोबत काम करताना खूप मजा आली. आमच्यावर दोन गाणी चित्रीत करण्यात आली आहेत. आमच्यावर चित्रीत करण्यात आलेलं टायटल साँग खूप सुरेख झालं आहे.

या जोडीसोबत अरुण नलावडे,  संजय खापरे,  वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका यात आहेत. दिग्दर्शिका सुचिता शब्बीर यांनी राहुल मोरे यांच्या साथीने या सिनेमाचं संवादलेखन केलं आहे. याखेरीज कोरिओग्राफर सुजीत कुमार यांच्यासोबत कोरिओग्राफीही केली आहे. छायालेखन सुरेश देशमाने यांनी केलं असून, राजेश राव यांनी संकलन केलं आहे. शब्बीर पुनावाला या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी गीतलेखन केलं असून, संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीतं गायली आहेत.

20 जुलै रोजी ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...