आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हास्यसम्राटाला अतिमद्यापानामुळे जडला होता मूत्रपिंडाचा आजार, पाहा आठवणीतील लक्ष्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत रसिक प्रेक्षकांना निखळ हास्याचे असंख्य क्षण देणार्‍या या हरहुन्नरी कलाकाराला कधी कोणी विसरू शकेल का? आज प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस. 3 नोव्हेंबर 1954 रोजी जन्मलेले लक्ष्मीकांत आज हयात असते तर त्यांनी वयाची 61 वर्षे पूर्ण केली असती.
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी सिनेसृष्टीत दीड ते दोन दशके अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणा-या या अभिनेत्याने 16 डिसेंबर 2004 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मूत्रपिंडाचा विकाराने वयाच्या 50व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डेंचे निधन झाले होते. अतिमद्यापानामुळे त्यांना मूत्रपिंडाचा विकार जडला होता. या हास्यसम्राटाला जाऊन दहा वर्षांचा काळ लोटला. मात्र आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्वांचा लाडका 'लक्षा' आजही आपल्यातच आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली होती. 'टुरटुर' हे त्यांचे पहिलेच नाटक जबरदस्त हिट ठरले होते. त्यानंतर आलेले 'शांतेचे कार्ट चालू आहे', 'बिघडले स्वर्गाचे द्वार', 'कार्टी चालू आहे' ही नाटकेही यशस्वी ठरली. लक्ष्मीकांत यांनी 1985 मध्ये 'लेक चालली सासरला' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांचे आलेले धुमधडाका (1985), अशी ही बनवाबनवी (1988), थरथराट (1989) सह अनेक सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले. अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे लक्ष्मीकांत यांचे ट्युनिंग कमालीचे होते.
सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैंने प्यार किया' या सिनेमाद्वारे त्यांनी 1989 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (1991), बेटा (1992) आणि हम आपके है कौन (1994) हे हिंदी सिनेमे खूप गाजले.
असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. म्हणूनच आपल्या लाडक्या लक्ष्याच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतीस स्नेहपूर्ण अभिवादन!
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवणीतील छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...