आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पु.लंच्या चरणी 'जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ' अभंग प्रकाशित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादर येथील प्रसिद्ध रवींद्र नाट्यमंदिरातील पुलंच्या पुतळ्याजवळ, त्यांच्या चरणी संजय कृष्णाजी पाटील रचित आणि संगीतकार अमितराज यांनी संगीतबद्ध केलेले व गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या भक्तिमय सुरांनी "जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ" हे 'ळ' चे यमक असलेल्या अभंगाचे अनावरण एका अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. ‘रंगनील क्रिएशन्स’च्या सौ. कल्पना विलास कोठारी निर्मित आणि युवा दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया'चा अभंग! प्रकाशित करण्यासाठी थेट पुलंच्या या जागेशिवाय इतर पवित्र जागा दुसरी नसल्याचे सांगत आम्ही 'दशक्रिया'च्या संहितेचेही पहिल्यांदा वाचन याच वास्तूत केले होते त्यांचं व्यक्तित्व अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आले आहे, त्यांच्या आशीर्वादानेच ही निर्मिती माझ्याकडून झाली असावी आणि त्यामुळेच हा योग जुळून आला असावा अशी प्रतिक्रिया या  चित्रपटाचे गीतकार, पटकथाकार, संवादकार आणि प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी दिली.

 

७२ मैल या चित्रपटातून उत्तमोत्तम गाणी दिल्यानंतर संगीतकार अमितराज आणि गीतकार संजय कृष्णाजी पाटील पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दशक्रिया या चित्रपटाची गाणी या दोघांनी केली आहेत. अभंग, लग्नगीत आणि लहान मुलांचं धमाल गाणं अशी वेगवेगळ्या प्रकारची तीन गाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

 

रंगनील क्रिएशन्सच्या कल्पना विलास कोठारी यांनी 'दशक्रिया' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी या चित्रपटाद्वारे आपलं दमदार दिग्दर्शकीय पाउल टाकत ३ राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांसोबत विविध सन्मान मिळावीत आपले स्थान बळकट करीत दिग्दर्शनातील प्रभुत्व दाखवून दिले आहे. साहित्यिक बाबा भांड यांच्या गाजलेल्या 'दशक्रिया' कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. संजय कृष्णाजी पाटील यांनी गीतलेखनासह चित्रपटाचं लेखन आणि प्रस्तुती केली आहे. आर्या आढाव, मनोज जोशी, दिलीप प्रभावळकर, मिलिंद शिंदे, आदिती देशपांडे, उमा सरदेशमुख, संतोष मयेकर, नंदकिशोर चौघुले अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. उत्तम कथानकाला श्रवणीय संगीताचीही जोड मिळाली आहे. संजय पाटील यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम गाणी लिहिली आहेत. 'दशक्रिया' या चित्रपटात ‘झिम्मा गं पोरी फुगडी’, ‘जगण्याचे देव लाभो ऐसे बळ’, ‘गुरुजीचं म्हातारं गजाकलं’ अशी तीन सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे.

 

गाण्यांविषयी गीतकार लेखक संजय पाटील म्हणाले, 'चित्रपटाची पटकथा मीच लिहिली असल्यानं कुठल्या प्रसंगाला गाणी येणार हे नेमकं माहित होतं. अभंग, लग्नगीत आणि लहान मुलांचं गाणं अशी तीन गाणी या चित्रपटात आहेत. ही गाणी चित्रपटाचं कथानक पुढे घेऊन जातात. अमितराज यांच्याबरोबर आधी काम केलेलं असल्यानं त्यांना माझ्या लिहिण्याचा अंदाज होता. मात्र, प्रसंगानुरूप त्यांनी माझ्याकडून गाणी लिहून घेतली. गाणी लिहिण्यासाठी बरंच कामंही करावं लागलं.'

 

'दशक्रिया’ या चित्रपटाची कथाच तगडी असल्यानं त्याची गाणी करणं हा छान अनुभव होता. अस्सल संगीत आणि कथानक पुढे नेणारी ही गाणी आहेत. त्याशिवाय संजय पाटील यांच्याशी उत्तम ट्युनिंग असल्यानं गाणी करताना काही अडचण नव्हती. वेगवेगळ्या पद्धतीची गाणी असल्यानं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडतील,' असं संगीतकार अमितराज यांनी सांगितलं.

आजच्या युवापुढीत प्रचंड लोकप्रिय असलेला आवाज म्हणजे स्वप्नील बांदोडकर! त्यांच्या त्यांच्या 'प्रेम' भावनेमुळे ते युवा - युवतींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या सुरांमध्ये विशेष जादू आहे. श्रोत्यांवर त्यांच्या गायनाचा प्रभाव सहज पडून ऐकणारे आपसूक त्यांच्या गाण्यासोबत एकरूप होतात. दशक्रीयातील हा अभंग त्यांची नवीन वेगळी ओळख तयार करेल. हा अभंग ऐकताना अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि श्रोते त्यात सहज गुरफटून जातात.

बातम्या आणखी आहेत...