आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: प्रियदर्शन जाधवने सांभाळली ‘चला हवा येऊ द्या’ची सुत्रे, शूट केला एपिसोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसे आहात सगळे? मजेत ना ? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना ? असा आपुलकीचा प्रश्न विचारत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. निलेश साबळे. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ ची गेल्या तीन वर्षांपासून एकहाती सुत्रे सांभाळणारा हा अवलिया कलावंत. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदा-या लिलया पेलणारा हा बहुगुणी कलाकार. गेल्या तीन वर्षांपासून निलेश आपल्या सहका-यांसोबत दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची रंगतदार मेजवानी घेऊन येतो आणि प्रेक्षकही आपल्या तणावाला ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत या हास्यसागरात बुडुन जातो.
 
आज या कार्यक्रमाचाच नाही तर झी मराठी वाहिनीचाही चेहरा बनलेला डॉ. निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. शो मस्ट गो ऑन हा आपल्या मनोरंजन इंडस्ट्रीचा आणि कलाकारांचा धर्म. याचमुळे निलेशच्या अनुपस्थितीतही हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यासाठी हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधवने या कार्यक्रमाच्या निवेदनाची सूत्रे सांभाली आहेत. प्रियदर्शनने या शोच्या एका भागाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. 
 
टॅलेंट हंट शोमधून समोर आला निलेश... 
महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या टॅलेंट हंट शोमधून निलेश साबळेची महाराष्ट्राला ओळख झाली. पुढे ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या विविध पर्वांचे निवेदन करत, त्यातील विनोदी प्रहसनांचं लेखन करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘फू बाई फू’ नंतर झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आला आणि त्याने मनोरंजनाची व्याख्याच बदलली. मराठी नाटक आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीचं हे हक्काचं व्यासपीठ बनलं. दर आठवड्याला थुकरटवाडीचे हे कलाकार येतात आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा सिलसिला गेल्या तीन वर्षांपासून अखंड सुरु आहे.

मुंबईतील स्टुडिओत चित्रीत होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्र दौ-यानिमित्ताने विविध शहरांमध्ये गेला आणि गावागावांतील प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वीही ठरला. या लोकप्रियतेची चर्चा अगदी बॉलिवुडमध्येही गेली आणि तेथील दिग्गज कलाकारांनीही या कार्यक्रमात हजेरी लावत आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या सर्व लोकप्रियतेमध्ये सिंहाचा वाटा आहे तो डॉ. निलेश साबळेचा. निवेदन, लेखन आणि दिग्दर्शन अशा तीनही जबाबदा-या त्याने यशस्वीपणे पार पाडल्या. हे सर्व करत असताना मागच्या काही दिवसांपासून निलेशला प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास जाणवत होता. यामुळेच निलेशने वैद्यकीय सल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल.

पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियदर्शन जाधवने शूट केलेल्या एपिसोडची निवडक छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...