आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : 'ड्रीममॉल'मुळे मी डिप्रेशनमध्ये गेले - नेहा जोशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री नेहा जोशी स्टारर ‘ड्रीममॉल’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय. खरं तर, चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सेटवरच्या गंमतीजमती सांगताना, आपल्या को-स्टारशी कशी गट्टी जमली आणि कसं बाँडिंग झाले, याविषयी सांगताना कलाकार दिसतात. मात्र नेहाचा ‘ड्रीममॉल’च्या चित्रीकरणाविषयीचा अनुभव अगदी विरूध्द आहे. तिच्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक वेदनादायी आणि उदासीन प्रवास होता.
ती याविषयी सांगते, “या चित्रपटामुळे माझ्यावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप ताण आला. खूप दमछाक करणारी ही फिल्म होती. जवळ जवळ १५ दिवस रोज रात्री आम्ही याचे चित्रीकरण एका मॉलमध्ये करत असताना, सिध्दार्थ जाधवकडनं अनेकदा मार खाल्ला आहे. सिध्दार्थने अनेकदा मला ढकलंल आहे. तो माझा पाठलाग करतो, आणि मी जीव वाचवून पळत असते, असे अनेक सिक्वेन्स यात आम्ही चित्रीत केले आहेत. रोज चित्रीकरणाच्यावेळी मला जबर लागायचे. एका सीनमध्ये सिध्दार्थ माझा पाठलाग करताना मी पळत होते. तेव्हा एका भितींचा कोपरा माझ्या डोक्याला चांगलाच लागला. आणि मी कळवळून थांबले. हा सीन जसाच्या तसा शूट झाला. आणि दिग्दर्शकाने चित्रपटातही ठेवला. एका सिक्वेन्समध्ये मॉलमधल्या गोल जिन्यातून मला सिध्दार्थ खेचत खेचत घेऊन जातो. या सिक्वेन्सच्या दरम्यान मला अक्षरश: संपूर्ण कंबरेला, पोटाला लागले आहे. रोज घरी जाताना मला प्रॉडक्शनची टीम आइसपॅक द्यायची. कारण रोज कुठे ना कुठेलागलेलं, आणि सुजलेलं असायचे. माझा ओरडून, आणि रडून घसा बसायचा. कधी कधी तर अंग एवढं जखमांनी दुखायचं की, कोणत्या जखमेने आज त्रास होतोय, हे ही समजेनास व्हायचे.”
“मानसिक दृष्ट्या तर ही फिल्म खूप त्रासदायकच होती. एवढ्या मोठ्या मॉलमध्ये एका विकृत माणसाने रात्रभर छळणं, ही गोष्ट खूप घाबरवणारी आहे. असा विकृत माणूस बलात्कारही करू शकतो. खूनही करू शकतो. बरं, तो बलात्कार आणि खून कोणत्या विकृत मार्गाने करेल याचीही कल्पना न केलेलीच बरी. त्या विकृत माणसाचे हिडीस खेळ आणि त्याचं खेळणं होणं, आपल्या नशीबात आल्यावर, येणारं डिप्रेशन सई या भूमिकेतून मी चित्रीकरणाचा संपूर्ण काळ अनुभवत होते.एवढा मानसिक त्रास दिलेली ही माझी एकुलती एक फिल्म आहे.”
“अतिशय गंभीर विषयावरचा हा चित्रपट असल्याने सेटवर आम्ही कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतो. सेटवर पूर्णवेळ मी एकटीच कोप-यात बसून राहायचे. मी मुंबईत एकटीच राहते. त्यामुळे ते १५ दिवस सतत ती भूमिका मी जगले. त्या भयानक परिस्थीतीचा सतत विचार करताना, ज्या मुलींना यातनं जावं लागलं असेल, त्यांच्याविषयी खूप वाईट वाटायचे. शक्ती मिल प्रकरण असो की, निर्भया बलात्कार प्रकरण, त्यातली भयावहता, या चित्रपटात मी सईची भूमिका साकरताना अंगावर येत होती आणि मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते.”
“एका सीनच्यावेळी तर चक्क १५-२० मिनीटे मी ओक्साबोक्शी रडले. सिध्दार्थने मला शारीरिक त्रास देण्याचा सिक्वेन्स सुरू होता आणि मला प्रतिकार करताना रडू फुटलं. अचानक पूर्ण चित्रीकरण थांबलं, पण माझं रडणं थांबत नव्हतं. मी का रडतेय, हे कोणालाच समजेना. पहिल्यांदा युनिटला वाटलं की चित्रिकरणादरम्यान सिध्दार्थकडनं काही चुकून त्रास झाला असावा का, पण त्या सिक्वेन्समुळे मी आतनं एवढी हादरले होते, की मला रडू आवरेचना.”
चित्रपटातल्या भूमिकेमुळे आलेल्या डिप्रेशनमधनं नेहाला बाहेर काढायला कारणीभूत ठरलं, ती त्याचवेळी करत असलेलं एक कॉमेडी नाटकं. दुर्देवाने हे नाटक रंगभूमीवर येऊ शकलं नाही. पण त्यामुळे कमीत कमी नेहाला डिप्रेशनमुळे बाहेर यायला मदत झाली. ती त्याबद्दल सांगते, ”ड्रीममॉलच्या चित्रीकरणानंतर नाटकाच्या तालमींनी मला खूप रिलीफ मिळाला, असंच म्हणावं लागेल. मलाच नाही सिध्दार्थला, आणि युनिटमधल्या प्रत्येक माणसाला त्यावेळी त्या चित्रपटाचा, त्यातल्या कथेचा त्रास झाला असणार.”
जाता जाता नेहा म्हणते, “खरं, तर, फिल्म्समध्ये आपण पाहतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा कोणी एखाद्या मुलीची छेड काढतं किंवा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा कोणीही सुपरमॅन येत नाही. आणि कोणी सुपरमॅन, कुणी हिरो, कुठूनतरी पोलिस येतील, याची वाट न पाहता, आपणच आपल्यासाठी उभं राहण्याची वेळ आता आलीय. हेच हा चित्रपट तुम्हांला सांगतो.”