आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : आयएएस होण्याचे होते स्पृहाचे स्वप्न, एकांकिकेनंतर बदलली करिअरची दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः अभिनेत्री स्पृहा जोशी)
अग्निहोत्र, उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट यांसारख्या मालिकांतील लक्षवेधी भूमिकांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 ऑक्टोबर 1989 रोजी मुंबईत स्पृहाचा जन्म झाला. अभिनेत्री आणि कवीमनाच्या स्पृहाचे यूपीएससी करून आयएएस होण्याचे स्वप्न होते.
काही दिवसांपूर्वी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पृहा म्हणाली, 'अभिनयाचा विचार कधीच मनाला शिवलाही नाही; मात्र महाविद्यालयात एकांकिका केल्यानंतर सर्व काही बदलले. 'शाळा' कादंबरीवर आधारित नाटकात केलेल्या शिरोडकरच्या भूमिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर नाटकात असतानाच 'अग्निहोत्र' मालिका मिळाली. 'उंच माझा झोका'मध्ये रमाबाईंच्या भूमिकेसाठी निवड झाल्यावर दबाव होता; पण आईने आत्मविश्वास उंचावल्याने ती भूमिका लक्षणीय ठरली."

आज स्पृहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्याविषयी आणखी बरेच काही सांगत आहोत...

मुंबईत झाला जन्म -
स्पृहा जोशी मुंबईची आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये तिचे बालपण गेले असून बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. स्पृहाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिला त्यासाठी बक्षिसेही मिळाली आहेत. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा राज्य शासनाचा ‘बालश्री 2003’ हा पुरस्कारही मिळाला होता. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणामध्ये आहे.

एकांकिकांमधून झाली अभिनयाला सुरुवात -
शालेय शिक्षण झाल्यावर स्पृहाने अभिनयासाठी आणि तसेच सेलिब्रिटींसाठी प्रसिद्ध असलेल्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रुईया कॉलेजसारख्या व्यासपीठाचा वापर करून घेत तिने कॉलेज स्तरावरील अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये कॉलेजतर्फे भाग घेतला आणि त्यात यश संपादन केले. मिलिंद बोकील यांच्या गाजलेल्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित ‘ग म भ न’ या एकांकिकेमध्ये तिने साकारलेले शिरोडकर हे पात्र चांगलेच गाजले आणि त्यामुळे तिचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर तिने ‘युग्मक’, ‘अनन्या’ अशा एकांकिकांमध्ये उत्तम भूमिका साकारली आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली.

रंगभूमीवर रमली -
कॉलेजच्या काळात स्पृहाने एका वृत्तपत्रासाठी कॉलेज रिपोर्टर म्हणूनही काम केलं होते. त्या वेळी तिने मांडलेले कॉलेज पातळीवरील विविध विषय वाखाणण्याजोगे होते.सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’ या नाटकाच्या संस्थेच्या ‘लहानपण देगा देवा’ या नाटकातही तिने काम केले आहे. स्पृहा केवळ अभिनेत्री नसून चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या ब्लॉगवरदेखील ती लिहिते. 'लहानपण देगा देवा', 'नेव्हर माइंड' यांसारख्या नाटकांमधून तिने रंगमंच गाजवला आहे. अलीकडेच हृषीकेश जोशी दिग्दर्शित 'नांदी' या नाटकातील तिची वृत्तनिवेदिकेची भूमिका आणखी एक मानाचा तुरा खोवणारी ठरली.

सिनेमातील पदार्पण -
प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले असून गजेंद्र अहिरे यांच्या गाजलेल्या ‘मायबाप’ या सिनेमातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिला ख-या अर्थाने चांगला ब्रेक मिळाला तो अवधूत गुप्तेच्या ‘मोरया’ हा सिनेमाने. त्यात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्यावर सोडली विशेष छाप -
स्पृहाचं नाव घराघरांत पोहोचलं ते ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेमुळे. या मालिकेत तिने साकारलेली कुहू प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यानंतर ती 'उंच माझा झोका' या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. या मालिकेतील रमाबाई रानडेंच्या भूमिकेसाठी स्पृहाचे खूप कौतूक झाले. याशिवाय तिची 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' ही मालिकासुद्धा खूप गाजली. सहज अभिनय करण्याचे कौशल्य असल्यानं तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘स्वामी’ या मालिकेतील रमा ही भूमिका ड्रिम रोल असल्याचे स्पृहाने एका मुलाखतीत सांगितलं होते.
गाजलेल्या मालिका-
दे धमाल, आभाळमाया, एक हा असा धागा सुखाचा, बॉम्बे लॉयर्स, स्ट्रगलर्स, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट या स्पृहाच्या गाजेलल्या मालिका आहेत.
मिळालेले पुरस्कार -
पारंगत सन्मान, बालश्री पुरस्कार 2003, सवाई अभिनेत्री, कवी कुसुमाग्रज पुरस्कार, चित्रदर्पण पुरस्कार हे स्पृहाला मिळालेले पुरस्कार आहेत.

कविमनाची स्पृहा -
पडद्यावर संवेदनशील अभिनय करणार्‍या स्पृहाला कविता करण्याची आवड आहे. तिचा ‘चांदणचुरा’ हा कविता संग्रह अक्षरग्रंथ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला असून त्यासाठी तिला ‘कवी कुसुमाग्रज’ पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय अलीकडेच तिचा 'लोपामुद्रा' हा कवीतासंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्पृहाची खास छायाचित्रे...

फोटो साभार - फेसबुक