मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. 'वाजले की बारा...' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अमृताचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले. अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.
लग्नानंतरचा पहिला वाढदिवस
अमृता यावर्षी 24 जानेवारीला दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठीत अडकली. दिल्लीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात अमृता आणि हिमांशूचे नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नापूर्वी म्हणजे 23 जानेवारीला या दोघांची संगीत आणि कॉकटेल पार्टी रंगली. अमृता आणि हिमांशू गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी त्यांनी आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.
आज अमृताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...