आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे इतिहासातील एकमेव ‘अँग्री यंग मॅन’, डॉ. अमोल कोल्हे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘जाज्वल्य प्रेरणा देणारे संभाजीराजे म्हणजे इतिहासातील एकमेव ‘अँग्री यंग मॅन’ होते. संभाजीराजांच्या काळात ४० लाख होन देऊन मुंबई मराठ्यांच्या ताब्यात आली असती, तर हिंदुस्थानचा इतिहास बदलला असता,’ अशी माहिती देऊन इतिहास- कादंबरीकारांकडून संभाजीराजांवर अन्याय झाल्याची खंत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

‘शंभुराजे ’या महानाट्यानिमित्त डॉ.कोल्हे शहरात आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘संभाजीराजे हे छत्रपती शिवाजीराजांपेक्षाही शूर होते, असा उल्लेख एका फ्रेंच इतिहासकाराने केला आहे. मात्र, असे अपवाद वगळता संभाजीराजांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्तृत्ववान पित्याचा रगेल आणि रंगेल मुलगा असेच करण्यात आले अाहे. वास्तविक ज्या जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजीराजांना घडवले, तेच संस्कार त्या माउलीने आपल्या नातवावरही केले असतील यात शंकाच नाही. शंभुराजांच्या बलिदानानंतर सलग २८ वर्षे मराठ्यांनी नेत्याशिवाय संघर्ष केला होता. यावरूनच संभाजीराजांचे नेतृत्व जाज्वल्य प्रेरणा देणारे होते, हे स्पष्ट होते. संभाजीराजांच्या काळात मुंबई मराठ्यांच्या हाती आली असती, तर हिंदुस्थानचा व महाराष्ट्राचा इतिहासच बदलला असता,’ असे मतही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

अखेरचा संघर्ष थरारक...
ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी या महानाट्यात आैरंगजेबाची भूमिका साकारली आहे. ते म्हणाले की, ‘आैरंगजेबाच्या नजरेतून ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. महानाट्यातील अखेरचा संघर्षाचा प्रसंग प्रेक्षकांना खूप भावतो.’
सीमा वादावरील ‘मराठा टायगर्स’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची पार्श्वभूमी असलेल्या ‘मराठा टायगर्स ’चित्रपटावरून मध्यंतरी वाद झाला होता. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजतो आहे. या चित्रपटाविषयी डॉ.कोल्हे म्हणाले, ‘सीमाभागातील ४० लाख मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहेत. कर्नाटक सरकार मराठीबहुल भागात कानडी बोलण्याची सक्ती करते. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट असल्याने कर्नाटक सरकारचा त्याला विरोध आहे.’