महालक्ष्मीच्या जयजयकरांत प्रसिध्द अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, प्रतिक्षा जाधव यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) पुण्याच्या सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात 300 कन्यांचे कन्यापूजन केले. कन्यापूजेस संध्याकाळी 4 वाजता प्रारंभ झाला. सर्वात पहिले अश्विनी कुलकर्णी आणि प्रतिक्षा जाधव यांनी कन्यांचे पाय धुतले. त्यानंतर कुंकु लावून त्यांचे पंचारतीने त्यांचे औक्षण केले. 300 कन्यांच्या केसांमध्ये मोग-याचे गजरे माळले. त्यानंतर कन्यांना नमस्कार करून त्यांची पारंपारिक पध्दतीने पूजा केली. या पूजेनंतर 300 कन्यांना शालोपयोगी वस्तू दिल्या. या विधीसाठी जवळपास 2 तासांचा कालावधी लागला.
कन्यांशी बोलताना अभिनेत्री अश्विनी म्हणाली, की मुलींनी चांगली पुस्तके वाचावीत त्यामुळे ज्ञानात भर पडण्यास मदत होते. आजच्या काळात मुलींनी शूर आणि धाडसी वृत्ती बाळगावी. संकटांचा सामना करावा. ज्ञान संपादन करून आदर्श भारतीय होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. तरच,
आपली आणि देशाची प्रगती होईल.
प्रतिक्षा म्हणाली, मुलींनी चांगला अभ्यास करून आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा. प्रसिध्द निवेदिका आणि रमा माधव फेम अश्विनी जोग यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित मुलींनी काही गाणेही म्हटली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कन्यापूजनाचे काही फोटो...