आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बच्चेकंपनी म्हणणार \'आटली बाटली फुटली\', छोट्या दोस्तांची एक रंजक कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आटली बाटली फुटली' याचा खरा अर्थ आतली बातमी फुटली. लहान मुलांच्या बोबड्या शब्दातून खेळता खेळता तयार झालेला हा शब्दप्रयोग आपण सर्वांनीच लहानपणी उच्चारलेला आहे.सध्याच्या धावपळीच्या युगात स्वकेंद्री वृत्ती वाढताना दिसत आहे. इतरांचा विचार करण्याची, त्यांना मदत करण्याची वृत्ती कमी होताना दिसत आहे. लहानपणी मुलांच्या मनावर जे बिंबवल जातं तशीच त्यांची जडणघडण मोठेपणी होत असते. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यात सहकार्याची भावना रुजवण्याच्या उद्देशाने निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी 'आटली बाटली फुटली' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. छोट्या दोस्तांचा हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे.
रनिंग रिल प्रोडक्शन यांच्या विद्यमाने 'आटली बाटली फुटली' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. लहान मुलांचे भावविश्व या चित्रपटातून उलगडणार आहे. टीव्ही, इंटरनेटच्या जंजाळात बच्चेकंपनी निखळ मैत्रीचा आनंद हरवून बसली आहेत. मैत्रीचे बंध त्यातला निखळ आनंद या चित्रपटातून लहानग्यांना अनुभवता येईल.
लहान मुलांसाठी हा चित्रपट नक्कीच मोलाचा ठरेल असा विश्वास निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी व्यक्त केला. अमोल पाडावे दिग्दर्शित 'आटली बाटली फुटली' या चित्रपटात नवोदित बालकलाकारांचा सहज-सुंदर अभिनय पाहता येईल. यात शरयू सोनावणे, विराज राणे, आदित्य कावळे, अनय पाटील, श्रेयाली वहाने, पूर्वा शहा, जीवन करळकर, विभव बोरकर, समिहा सबनीस यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा विक्रम चव्हाण यांनी लिहिली असून पटकथालेखन अमोल पाडावे यांनी केलं आहे. गीतरचना जन्मेजय पाटील, स्वप्निल जाधव यांची तर छायांकन अनिकेत के. यांनी केलं आहे. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील 'आटली बाटली फुटली', 'सांग आई' या सारखी धमाल गाणी हे या चित्रपटाचं वैशिष्टय ठरणार आहे.
मनोरंजनातून मूल्यांचा पाठ देणारा धमाल विनोदी तितकाच संवेदनशील चित्रपट लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच भावेल असा आहे.