आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Watching The Film ‘Lokmanya: Ek Yugpurush’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बघितला 'लोकमान्य-एक युगपुरूष', प्रीमिअरला लावली विशेष हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(“लोकमान्य-एक युगपुरूष” या सिनेमाच्या प्रीमिअरवेळी क्लिक झालेली छायाचित्रे)
“देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या नेत्यांपैकी एक लोकमान्य टिळक होते. आज 94 वर्षानंतर लोकमान्य टिळक यांना पाहण्याची व अनुभवण्याची संधी ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ या चित्रपटाच्या निमित्ताने जनतेला मिळत आहे. आजच्या युवा पिढीला लोकमान्य टिळक यांचे व्यक्तिमत्व व त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याचा परिचय या चित्रपटाद्वारे होणार असून हा चित्रपट युवकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल” अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये 1 जानेवारी रोजी “लोकमान्य - एक युगपुरूष” चित्रपटाचा भव्यदिव्य प्रीमियर सोहळा मोठ्या थाटात पार पडला. हा चित्रपट बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी मा. राज्यपाल श्री सी. विद्यासागर राव, लोकमान्यांचे पणतू तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे संचालक डॉ. दीपक टिळक, पत्रकार भारतकुमार राऊत, निर्मात्या नीना राऊत, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी, दिग्दर्शक ओम् राऊत आणि चित्रपटात लोकमान्यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटाबद्दल बोलतांना श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, “लोकमान्य टिळक यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी आहे. भारतीय असंतोषाचे जनक, अभ्यासू पत्रकार, कायदेतज्ज्ञ, थोर समाजसुधारक, कुटुंबवत्सल माणूस, देशप्रेमी असे बहुविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होते. त्यांचे व्यक्तिमत्व साकारणे हे खरोखरच एक आव्हान असून ते अभिनेते सुबोध भावे यांनी स्वीकारले व उत्तमरित्या साकारले तसेच दिग्दर्शक आणि सहका-यांनीही हा विषय अचूकपणे मांडला याबद्दल त्यांचे अभिनंदन.”
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, “लोकमान्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनावा ही माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा या चित्रपटामुळे पूर्ण झाली. ओम् राऊत आणि त्यांच्या टीमने अतिशय मेहनत घेऊन हा चित्रपट बनवलाय. या चित्रपटाद्वारे पुस्तकांपलिकडचे लोकमान्य आपल्याला कळतील” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. टिळक यांनी मा. मुख्यमंत्री आणि मा. राज्यपाल यांचा ‘केसरी’ वृत्तपत्राच्या “पुनःश्च हरिओम” या अग्रलेखाची प्रतिकृती आणि लोकमान्यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
नीना राऊत फिल्मची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम् राऊत यांनी केले आहे तर प्रस्तुती एस्सेल व्हिजनची आहे. 2 जानेवारीपासून हा चित्रपट महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि कोलकाता या राज्यांतही सुमारे तीनशे चित्रपटगृह आणि दिवसाच्या साडेपाच हजारपेक्षा जास्त खेळांद्वारे दणक्यात प्रदर्शित झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रीमिअरला क्लिक झालेली मान्यवरांची खास छायाचित्रे...