‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेचा आता शेवट होत असल्याने मालिका संपता-संपता जान्हवीला मुलगी झाली, ह्या गोड बातमीने मालिका संपताना गोखले कुटूंबामध्ये आनंदी-आनंद झालेला दिसणार आहे. गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदा सरूमावशीचं लग्न त्यानंतर बेबी आत्याच्या आयुष्यात पून्हा तिचा नवरा परतणं, ह्या गोष्टी दिसल्याच होत्या. आता गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या बातमीची प्रेक्षक वाट पाहत होते. ती गोड गोष्ट होताना मालिकेत दिसेल.
आत्तापर्यंत जान्हवीच्या बाळासंबंधी सोशल मिडीयावर बरेच विनोद झाले. पण आता शेवटी जान्हवीला बाळ झालंय. त्यामुळे तेजश्री हसून म्हणते, “हो बाबा, शेवटी १८ महिन्यांनंतर जान्हवीला बाळ झालंय. मालिका संपताना आम्ही आमच्या प्रेक्षकांना एक छान गोड बातमी देतोय. त्यामुळे हसतं-हसतं आनंदी वातावरणात मालिका संपतेय.”
जान्हवीला मुलगी होणं, त्यानंतर
आपल्या बाळाला घेऊन हॉस्पिटलमधनं घरी परतलेली जान्हवी, त्यामूळे गोकुळ ह्या गोखलेंच्या घरात खरंच झालेलं गोकुळासारखं वातावरण, त्यातच श्रीच्या वडिलांचं परतणं ह्या गोष्टी नुकत्याच चित्रीत झाल्यात. जान्हवीच्या मुलीच्या भूमिकेत मालिकेमध्ये एक महिन्याच्या एका छोट्या बाळाने एन्ट्रीही घेतलीय.
इतके दिवस आज्ञाधारक मुलगा आणि प्रेमळ नव-याच्या भूमिकेत दिसलेला श्री आता मायाळू वडिलांच्या भूमिकेत दिसेल. आपल्या ह्या नव्या भूमिकेविषयी सांगताना श्री म्हणतो, “इतक्या लहान बाळाला कधी हाताळलं नसल्याने जो नुकत्याच बाळ झालेल्या बाबांमध्ये बाळाला हाताळताना जो ऑकवर्डनेस असतो. तोच तुम्हांला श्रीमध्येही दिसेल. बाळ रडतं म्हणजे आता नक्की त्याला काय हवं असेल, हे तो समजून घेतोय. बाळाच्या गरजा समजून घेताना गोंधळलेला श्री तुम्हांला दिसेल. ह्याशिवाय गेल्या काही महिन्यांत श्री-जान्हवीने घरच्यांच्याबाबत जे स्वप्न पाहिलं होतं, की घरातल्या सर्वांचीच आयुष्य सुरळीत व्हावीत. ते कुठेतरी आता पूर्ण झालंय. गोखलेंच्या घरात कधी बाळ नांदत नाही. ही गोष्ट मालिकेच्या सुरूवातीपासूनच आपण जी पाहत आलो आहोत, ती गोष्ट आता संपताना दिसेल. घरात मुलं आल्याने घर छान हसतं-खेळताना आपण पाहणार आहोत. मालिकेमधली सगळी मुख्य पात्र तुम्हांला गोखलेंच्या घरात आता आनंदात दिसतील.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, श्री-जान्हवीच्या तान्हुलीसोबत कसं झालं शशांक आणि तेजश्रीचं बॉन्डिंग