आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बाईचं शरीर दाखवून बॉक्स ऑफिसवर पैसा कमावणा-यांतली मी नाही’ – श्रावणी देवधर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिग्दर्शिका श्रावणी देवधर)
‘साटंसोटं-पण सगळं खोटं’ हा चित्रपट ह्या शुक्रवारी रिलीज होतोय. चित्रपट श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलाय. 'लपंडाव' ह्या पहिल्याच सिनेमातनं राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर 'सरकारनामा' आणि 'लेकरू' सारखे चित्रपट बनवलेल्या श्रावणी देवधर यांनी आपल्या नेहमीच्या पठडीला सोडून विनोदी चित्रपट बनवलाय. अचानक विनोदी जॉनरकडे का वळावसं वाटलं असं विचारलं असता त्या सांगतात, “खरं तर आजपासून 15 वर्षांपूर्वी 'लेकरू' चित्रपटाच्यावेळीच या चित्रपटाची कथा माझ्या डोक्यात आली. तेव्हा मी माझा नवरा आणि सुप्रसिध्द सिनेमॅटोग्राफर देबूला कथा ऐकवली सुध्दा होती. पण काही ना काही कारणाने चित्रपट बनला नाही. मध्यंतरीच्या काळात अचानक देबूला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याचं निधन झालं आणि पाठोपाठ माझे आई-वडीलही गेले. या सगळ्यातनं मी पूरती खचून गेले होते. काहीही करायचं मनं नव्हतं. त्यात स्टार प्रवाहची जबाबदारी माझ्यावर होती. मी स्वत:ला स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त करून टाकलं होतं. आणि नंतर मला पुन्हा एकदा साटलोटंच्या संहितेची आठवण झाली. त्यावेळी देबूसोबत चर्चा केलेल्या या संहितेला सिल्व्हर स्क्रिनवर आणण्याचं ठरवलं. मी हसणं विसरून गेले होते. देबूशिवाय फिल्म बनवणं अशक्य वाटतं होतं. मग मला झालेल्या मानसिक त्रासातनं बाहेर पडायला मी ही फिल्म बनवण्याचं ठरवलं.”
श्रावणी देवधर यांची मुलगी आणि अभिनेत्री सई देवधर ही फिल्म बनवताना सातत्याने त्यांच्या पाठीशी होती, “खरं सांगायचं झालं तर सई पाठीशी लागली होती. पुन्हा एकदा फिल्ममेकिंग कर म्हणून तिच्या हट्टपोटी आणि ती सतत सेटवर माझ्यासोबत असल्यानेच मी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसू शकले. शिरीष लाटकरला मी कथा ऐकवल्यावर त्याने तर 15 दिवसांमध्ये संवाद लिहून आणले सुध्दा. आणि मग मलाही हुरूप आला.”
या युथफुल फिल्ममध्ये आदिनाथ कोठारे, मृण्मयी रानडे, सिध्दार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, मकरंद अनासपुरे, पुजा सावंत हे कलाकार आहेत. आणि या चित्रपटातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ठ्य यातले निखळ मनोरंजन करणारे संवाद असल्याचं आणि ही एक ‘सिच्युएशनल कॉमेडी’ प्रकारातली फिल्म असल्याचं श्रावणी देवधर सांगतात. ”मी एक स्त्री असल्याने मला कॉमेडी करायची म्हणून अश्लील संवाद असलेले आवडतं नाहीत. कोणत्याही स्त्रीचं उगाचं अंगप्रदर्शन स्वत:च्या सिनेमात करणा-या फिल्ममेकर्सपैकी मी नाही. मला स्त्रीला शोभेची बाहूली बनुन दाखवायला नाही आवडतं. त्यामुळे ही संहिताचं काय पण माझी कोणतीही संहिता कधीही डबलमिनींग असलेल्या संवादाची तुम्हांला दिसणार नाही. बाईचं शरीर दाखवून बॉक्स ऑफिसवर पैसा कमावणा-यातली मी नाही. कारण माझी नातंही माझे सिनेमे आज पाहते. आणि तिच्यासोबत किंवा जावया सोबत फिल्मपाहताना मला लाज वाटू नये, असेच सिनेमे मी बनवणार”
‘साटं लोटं – पण सगळं खोटं’ हा चित्रपट 5 जुनला रिलीज होतोय. आणि याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास श्रावणी देवधर व्यक्त करतात.