(जेनेलिया आपल्या चिमुकल्यासोबत)
स्टार कपल जेनेलिया आणि रितेश देशमुखचा मुलगा रिआन देशमुख आता सहा महिन्यांचा झालाय. पण आत्तापासून जेनेलिया त्याच्यावर होणा-या संस्काराबाबात फारच सतर्क असल्याचं दिसतंय. विलासराव देशमुखांच्या नातवाच्या कानावर लहानपणापासूनच चांगलं कानी पडो, याची दक्षता ती घेताना दिसत आहे.
खरं तर आजकालच्या एन्ड्रॉइडच्या जमान्यात पालक आपल्या चिमुरड्यांना कोणत्या ना कोणत्या इंग्रजी ‘–हाईम्स’ शिकवत असतात. मुलांनी प्ले स्कुलमध्ये जायच्या अगोदरच त्यांच्याशी मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये सुध्दा सर्रास इंग्रजीत बोलण्यावर प्राधान्य दिलं जातं. आणि मग बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेतल्या तारे-तारकांच्या मुलांचे तर वारेच न्यारे असतात, असं मानलं जातं.
पण जेनेलिया मात्र छोट्या रिआनवर मराठीचे संस्कार व्हावेत, यासाठी दक्ष आहे. आणि तिने चक्क दिग्दर्शक रवि जाधव यांची त्यासाठी मदत मागितली आहे. मोरोपंताच्या केकावलीतला सुप्रसिध्द श्लोक म्हणजे ‘सुसंगती सदा घडो’. मराठी शाळांमध्ये पूर्वी हा श्लोक शिकवला जायचा. पण नंतर काळानुरूप तो पुस्तकात राहिला आणि विस्मृतीत गेला. पण रवि जाधव यांनी या श्लोकाला सिल्व्हर स्क्रीनवर स्थान दिलं ते, ‘बालक पालक’ चित्रपटामधनं आणि त्यामुळे तो पुन्हा एकदा ओठी रूळला.
“जेनेलिया आपल्या छकुल्याला हा श्लोक रोज युट्युबवरून ऐकवते. पण जेनेलियाकडे त्याची MP3 नाही आहे. आणि ती तिने माझ्याकडे मागितली आहे. आणि ती मी आता लवकरच पाठवणार आहे”, असं रवि जाधव सांगतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रितेश आणि जेनेलियाने अलीकडच्या काळात शेअर केलेली रिआनची खास छायाचित्रे...