आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fathers\'s Day: रविंद्र महाजनींचा मुलासोबत रंगला बुद्धिबळाचा डाव, पाहा कसा रंगला सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेते रविंद्र महाजनी मुलगा गश्मीरसोबत बुद्धिबळाचा डाव खेळताना टिपलेली छायाचित्रे)
मुंबईः खिडकी बाहेर पाऊस पडत होता आणि आत अभिनेता गश्मीर महाजनी आणि त्याचे वडील रविंद्र महाजनी यांच्यात बुध्दिबळाचा डाव रंगला होता. सोबत होता वाफाळलेला चहा आणि न संपणा-या गप्पा. गश्मीरचे वडील अभिनेते रविंद्र महाजनी फक्त अॅक्टिंगमध्येच सुपरस्टार नाहीत, तर बुध्दीबळातही आहेत, हे त्यांच्या परफेक्ट चालींमुळे ते दाखवून देत होते. Father’s day च्या निमित्ताने दोघं बाप-बेटे एकत्र आले होते.
असा खेळ महिन्यांतनं किती वेळा रंगतो, असं गश्मीरला विचारल्यावर तो म्हणाला, ”खरं तर कधीच नाही. माझे वडिल बुध्दीबळ खेळण्यात एक्सपर्ट आहेत. ते दिवस दिवस खेळु शकतात. अगदी कुणीच नसेल तर एकटेही तासन् तास खेळू शकतात. पण मी त्यांच्यासोबत आज divyamarathi.com च्या साक्षीने असा पहिल्यांदाच खेळतोय. मला बुध्दीबळ अगदीच जुजबी खेळता येतं. मी मैदानी खेळच जास्त खेळलोय. मी कॉलेजमध्ये असताना स्टेटलेव्हलला टेनिस आणि नॅशनल लेव्हलला बास्केटबॉल खेळायचो. एथेलॅटिक्सचीही मला आवड होती. क्रिकेटही खूप खेळलो. त्यामुळे बुध्दिबळात जास्त रमलो नाही आणि घरी वडिलांसोबत कधी खेळलो नाही. पण बाबांमुळे मला व्यायामाची आवड लागली. 3 वर्षांचा असताना मी त्यांच्यासोबत जीममध्ये जायचो. आणि मग तिथूनच स्पोर्ट्सची आवड लागली.”
रविंद्र महाजनींनी आपल्या हिट चित्रपटांनी एक काळ गाजवल्यावर फिल्मइंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि त्यांनी पुण्यात कन्स्ट्रक्शन बिझनेस सुरू केला आणि त्यामुळेच गश्मीरने वडिलांचं सुपरस्टारडम अनुभवलं नाही. एका सामान्य मराठी कुटूंबातलं बालपण त्याला मिळालं. पण शेवटी अभिनयाचा वारसा त्याला रक्तातनंच मिळाला होता. त्यामुळे तो ही आपोआप अभिनयाकडे ओढला गेला. आपली आवड त्याने फक्त वडिलांना बोलूनच नाही दाखवली तर, त्यासाठी त्याने अभ्यासही सुरू केला. नसिरूद्दीन शाहंचे एक्टिंग क्लासेस त्याने जॉईन केले. वर्ल्डसिनेमातले लोकप्रिय चित्रपट पाहिले. प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय केला. विजय केंकरेंच्या ‘दादाची गर्लफ्रेंड’ नाटकातही तो दिसला. सिनेमॅटोग्राफर अशोक मेहतांना असिस्ट केलं. आणि मग आता तो मराठी चित्रपटात आपली कारकिर्द सुरू करतोय.
वडिलांकडनं अभिनयाशिवाय अजून कोणते गुण घेतलेस असं गश्मीरला विचारल्यावर तो म्हणतो, ”मेहनत आणि कामातलं समर्पण. फक्त तुमच्यातली हुशारी आणि कौशल्य असलं तर तुम्ही यशस्वी होत नाही. आपल्या हुशारीला मेहनत, कामातलं समर्पण आणि सचोटीने कामं करण्याची इच्छाही तितकीच गरजेची असते, हे मी त्यांच्याकडे पाहून शिकलो.”
एवढ्यावेळ गश्मिरकडे कौतुकाने पाहणा-या रविंद्र महाजनींना तुम्हांला गश्मिरकडे पाहून आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण येते का असं विचारले असता, रविंद्र महाजनी म्हणाले, ”त्याची आणि माझी परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. मी त्याच्या वयाचा असताना टॅक्सी चालवत होतो. मी खालसा महाविद्यालयात होतो. तेव्हा रमेश तलवार, अवतार गिल, अमृत पटेल, रॉबीन भट हे सगळे माझे तेव्हांचे मित्र. आम्हा सर्वांना नाटकाची आवड. पण वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने पैसेही जेमतेमच गाठीशी होते. आणि नोकरी करणं गरजेचे होते. मग अॅक्टिंग करणं आणि पैसे कमावणे यातनं सुवर्णमध्य काढला आणि दिवसा निर्मात्यांना भेटता यावे, म्हणून रात्री टॅक्सी चालवायला लागलो. रात्री पैसे कमवायचो आणि दिवसा आपले अॅक्टिंगचे वेड जपण्याचा प्रयत्न केला. तीन वर्ष मुंबईत टॅक्सी चालवली. माझ्या नातेवाईकांनी टॅक्सी चालवतो. म्हणून माझ्याशी संबंध तोडले. पण मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले. आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले. त्यामुळे गश्मीरची आणि माझी परिस्थितीच विसंगत होती. तो लहान असताना सुध्दा गश्मीरने उद्या काही वेगळं करायचं म्हटलं तर चार पैसे आपल्या गाठीशी हवेत, या विचाराने मी अॅक्टिंग सोडली आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला.”
रविंद्र महाजनी यांचे वडिल ह.रा.महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. एका प्रतिथयश आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे ते संपादक होते. वडिलांची शिकवण रविंद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली ते पूढे म्हणतात, “वडील मला म्हणायचे, तु कुठलंही काम कर. पण प्रामाणिकपणे कर. त्या कामाशी बेईमानी करू नकोस. बघ, यश तुझंच आहे. वडील संपादक होते, त्यामुळे बाळासाहेब देसाई ते यशवंतराव चव्हाण अनेक मोठ्या मंत्र्यांची घरी ये-जा असायची. पण कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, त्यांनी आपल्या परखड आणि काटेखोर पत्रकारितेमुळे आणि मुल्यांमुळे पत्रकारितेत इतिहास घडवला. हे मला कधीच विसरता येणार नाही. आणि तिचं शिकवण आज मी माझ्या मुलाला देतो आहे.”
वडिलांकडून मुलांकडे परंपरा आणि वारसा पुढे सरकतो, असं म्हटलं जातं. ग्लॅमरस जगात राहूनही नॉन-ग्लॅमरस आयुष्य जगणा-या आणि आपल्या मुल्यांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करण्याची परंपरा आपल्या मुलाला देणा-या महाजनींच्या दोन पिता-पुत्रांच्या जोड्यांबद्दल जाणून घेतल्यावर ‘फादर्स डे’चं फुलं-गिफ्ट्सच्या पलिकडचं वेगळं सेलिब्रेशन झाल्याचं समाधान वाटलं.
फादर्स डेच्या निमित्ताने कसा रंगला महाजनी पिता-पुत्रात बुद्धिबळाचा डाव, पाहा छायाचित्रांमध्ये...
(सर्व फोटोः अजीत रेडेकर)