ऐश्वर्या राय स्टारर ‘जीन्स’, कमल हासन स्टारर ‘हिंदूस्तानी’, आणि रजनीकांत स्टारर ‘कोच्चड्डय्यन’ चित्रपटांसाठी काम केलेले तमिल फिल्ममेकर आर माधेश आता मराठीमध्ये ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा बनवतायत. ‘फ्रेंड्स’ त्यांनी लिहीलाय, आणि ते दिग्दर्शित ही करतायत.
गेली जवळ जवळ २० वर्ष तमिळ चित्रपटसृष्टीत काम केल्यावर मराठीत चित्रपट का करावासा वाटला? असं विचारल्यावर ते म्हणतात, “मी गेली १० वर्ष मराठी चित्रपटांचा अभ्यास करतोय. मी गेल्या एक-दोन वर्षांपासून मुंबईत येऊन-जाऊन असतो. मी मराठी नाटकंही पाहिलीयत. ‘मोरूची मावशी’, ‘वाडा चिरेंबदी’सारखी नाटकं मी पाहिलीयत. त्यामूळे मला मराठी कळतं. फक्त लिहीता. वाचता किंवा बोलता येत नाही.”
“मला असं वाटतं, चित्रपटाची कोणती भाषा नसते. दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्चंद्र’ तर मुकपट होता. तरी त्यांना काय सांगायचंय, ते आपल्याला कळलंच ना. आपल्या मराठीत रडता येत का? तमिळमध्ये चिडता येत का? किंवा चायनीजमध्ये हसता येत का? हे इमोशन्स कोणत्या एका भाषेशी निगडीत नाहीत. ते सर्व भाषांमध्ये सारखेच असतात. त्यामूळे मराठीत चित्रपट करणं मला तमिळमध्ये करण्यापेक्षा वेगळं वाटतं नाही. फक्त माझ्या दृष्टीने मराठी चित्रपट करताना दिग्दर्शक म्हणून एकच फरक झाला. एरवी चित्रपटाची स्क्रिप्ट ही एकाच भाषेत असते. माझी स्क्रिप्ट तमिळ, इंग्रजी आणि मराठी अशा तीन भाषांमध्ये होती. त्यामूळे मला प्रत्येक संवाद, आणि सीन दिग्दर्शित करताना सोप्प झालं.”
आर माधेश दर आठवड्याला दोन तरी मराठी चित्रपट पाहतात, मराठी चित्रपटाचं वैशिष्ठ्य सांगताना ते म्हणतात, “मराठीसारखे दर्जेदार चित्रपट मी इतर भाषांमध्ये पाहिले नाहीत. ‘बीपी’ म्हणजे ‘बालक-पालक’ सारखे चित्रपट तर इतर भाषांमध्ये होणे नाही. ‘बालक-पालक’ सारखा सेक्स-एज्युकेशनवरचा चित्रपट कुठेही अश्लिल न होता, इतक्या कलात्मकपणे, फक्त रवी जाधवच बनवू शकतो. आणि तो फक्त मराठीतच हिट होऊ शकतो. इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेतील दिग्दर्शक तो करायला धजावणार नाही. आणि प्रेक्षक तो स्विकारणारही नाहीत, फक्त मराठीतच असे नाविन्यपूर्ण प्रयोग होऊ शकतात. त्यामूळेच मी मराठी चित्रपटांकडे आकर्षित झालोय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आर माधेश आणि बीपी चित्रपटाचे फोटो