आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य घटनेवरून प्रेरित झालेला मराठी चित्रपट “WHAT ABOUT SAVARKAR?”

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटाचे पोस्टर)
17 एप्रिलला अवघ्या महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेला 'व्हॉट अबाऊट सावरकर?' हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रखर राष्ट्रभक्त विचारधारेवर आधारीत असलेला मराठी सिनेमा 2004 मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे.
याला दुजोरा देताना निर्माते रोहित के. शेट्टी म्हणाले की, 2004 मध्ये एका केंद्रीय मंत्र्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिरेकी संबोधल्याने देशभर ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, त्याच घटनांवर आधारीत आमच्या चित्रपटाची पटकथा आहे. यात आम्ही कुठेही प्रत्यक्षपणे त्या मंत्र्याचे नाव अधोरेखित केलेले नाही. सावरकरांच्या अवमाना बदल्यात त्या मंत्र्याला अद्दल घडविण्याचे धाडस आमच्या चित्रपटातला नायक करतो आणि हे करते वेळी जे जे काही घडते ते ते या चित्रपटाच्या पटकथेचा भाग आहे.
हाच धागा पकडून दिग्दर्शक नितीन गावडे म्हणाले, की 2004 मध्ये ही कथा तयार झाली त्याला कारण ठरले एका केंद्रीय मंत्र्याने सावरकरांचा केलेला अपमान. ज्या दिवशी कमाल काव्याच्या ओळी लिहिलेली पाटी अंदमानातून काढून टाकली गेली त्या कित्येक दिवसात झोप लागली नव्हती आणि कोणीच काही प्रतिक्रियाही देत नव्हते. त्यामुळे अधिक अस्वस्थता वाढली. अपवाद केवळ माननीय बाळासाहेबांचा. त्यांनी पार्कात सभा घेवून त्या मंत्र्याच्या पुतळ्याला चपलांचा मारा केला. या कथेची प्रेरणा बाळासाहेब आहेत. कथेचा नायक दिल्लीत जाऊन सावरकरांच्या अपमानाचा बदल घेतो. त्याकरिता कथेत नायकाचा प्रवास आला आहे. या प्रवासात संपूर्ण देशाला जोडणे आवश्यक होते. त्याकरिता पंजाब आणि मणिपूर आले आहे. पंजाबचं आणि सावरकरांचं घट्ट नातं आहे. मणिपूर याकरिता की पूर्वेकडील एक राज्य चित्रपटात असावं जेणेकरून देशाचा जो भाग आज ही दुर्लक्षित आहे त्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, तो आपलासा वाटावा.
आज महाराष्ट्रापुढील सर्वात मोठी समस्या आहे जाती भेद. सावरकरांनी जाती भेदाच्या भिंती तोडण्याचा आग्रह धरला व कृतीही केली, मात्र परिस्थिती बदललेली नाही. त्यावर ही भाष्य करायचं होत म्हणून अभिमानच्या लढ्यात क्रांती कांबळे आणि सुर्यकांत पवार ही आलेत. ही कथा केवळ सावरकरांच्या अपमानाचा बदल्याची नाहीय तर महाराष्ट्राच्या ऐक्याचीही आहे.
या चित्रपटाचं लेखन नितीन गावडे यांनी केले असून रुपेश कटारे आणि नितीन गावडे यांनी दिग्दर्शन केले आहे. श्रीकांत भिडे, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, अतुल तोडणकर, प्रसाद ओक आणि सारा श्रवण हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.