एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शनचा ‘जाणिवा’ हा मराठी सिनेमा उद्या म्हणजे 31 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राजेश रणशिंगे दिग्दर्शित या सिनेमात स्वर्गीय अरुणा शानबाग हिच्या दुर्दैवी कथेपासून प्रेरित अशी भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. आसावरी पाटील हे या व्यक्तिरेखेचे नाव असून ही भूमिका अभिनेत्री गौरी कोंगे हिने साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी गौरीला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. यासाठी तिने अरुणा शानबाग यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ बरेच दिवस पाहिला. 42 वर्षे कोमात राहिलेल्या अरुणाची भूमिका पडद्यावर साकारणे हे गौरीसाठी एक आव्हान होते. मात्र तिने हे आव्हान योग्य पेलले आहे. या सिनेमातील तिची झलक बघितली असता, गौरीने या भूमिकेला न्याय दिला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गौरीसोबत या सिनेमात सत्या मांजरेकर, वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, संकेत अग्रवाल, किरण करमरकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, उषा नाडकर्णी, किशोर कदम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर स्पेशल अपिअरन्समध्ये झळकणार आहे.
गौरी कोंगे आज मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखीचा चेहरा झाला आहे. मात्र सहजासहजी गौरीने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केलेले नाही. त्यासाठी तिलाही बरीच धडपड करावी लागली आहे.
चला तर मग कोण आहे 'जाणिवा'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी गौरी कोंगे, यापूर्वी तुम्ही कोणत्या सिनेमांमध्ये तिला पाहिले आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये देत आहोत..