आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girish Karnad\'s Comeback To Marathi Films After 33 Years!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'उंबरठा\'नंतर तब्बल 33 वर्षांनी गिरीश कर्नाड मराठी सिनेमात, छेडतील \'सरगम\'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड तब्बल 33 वर्षांनी मराठी सिनेमांत दिसणार आहे. 1982 मध्ये आलेल्या 'उंबरठा' या सिनेमात त्यांनी स्मिता पाटीलसोबत काम केले होते. त्यानंतर आता ते 'सरगम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
'उंबरठा' हा माझ्या आयुष्यातला 'सुवर्णकाळ' आहे. काही आठवणी माणसाला जगवतात अशा 'उंबरठा'च्या आठवणी आहेत. उंबरठा 1982 ला प्रदर्शित झाला त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर 1987 मध्ये 'मालगुडी डेज' या मालिकेत काम केले आणि थेट आता 33 वर्षांनी पुन्हा मराठी सिनेमा मला बोलवितो आहे, असे गिरीश कर्नाड म्हणतात.
आता बंगळूरुमध्ये वास्तव्याला असलेल्या आणि पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कारांसह कालिदास सन्मान, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार असे असंख्य नामांकित पुरस्कार विजेते असलेले कर्नाड केवळ नाटककार, अभिनेता, निर्माता, लेखकच नाहीत तर सामाजिक समस्यांवर उचित भाष्य करणारे मोठे साहित्यिक आहेत. संगीत नाटक अकादमी, पुण्याच्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केले .
महाराष्ट्राच्या मातीतच माथेरान येथे जन्मलेल्या कर्नाड यांना कवी होण्याची इच्छा होती, पण कर्नाड इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले आणि तेथूनच त्यांना नाटकाचे आकर्षण वाटू लागले. चेन्नई, शिकागो येथे प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर ते पूर्णवेळ नाटकांकडे वळले. 1961 नंतर ययाती , तुघलक अग्नी ओर बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे, हयवदन अशी अनेक नाटके गाजली. 1970 मध्ये 'संस्कार' नावाच्या कन्नड चित्रपटापासून त्यांची फिल्मी सफर सुरु झाली. शेखर सुमन आणि रेखा यांची भूमिका असलेला 'उत्सव 'अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्याचे दिग्दर्शन कर्नाड यांनी केले. 'हे राम , पुकार, आक्रोश, मेरी जंग, स्वामी, इक्बाल अलीकडे 'एक था टायगर' अशा हिंदी, मल्याळम, तेलगु, तमिळ, मराठी अशा 70 हून अधिक चित्रपटात कर्नाड यांनी भूमिका केल्या.
आगामी मराठी चित्रपट 'सरगम ' च्या निमित्ताने आता ते पुन्हा मराठीत दिसतील. या चित्रपटात ते जंगलात भटकणाऱ्या एका अवलियाची भूमिका साकारणार आहेत. अहमदनगर-अकोल्या नजिकच्या भंडारदरा येथे या सिनेमाचे चित्रीकरण होणार आहे. गिरीश कर्नाड पुन्हा मराठी रसिकांच्या मनात 'सरगम' छेडतील असा विश्वास या सिनेमाचे निर्माते एम के धुमाळ आणि दिग्दर्शक शिव कदम यांनी व्यक्त केला आहे.