आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्य विनोद आणि स्टार्सच्या परफॉर्मन्सेसनी रंगला ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स’ सोहळा, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळा’ नुकताच संपन्न झाला. कॉमेडी अवॉर्ड्स म्हणजे विनोदाचा तडका असणारच आणि या सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले.
‘पोश्‍टर बॉईज’ने उमटवली मोहोर...
या सोहळ्यावर मोहोर उमटवली ती ‘पोश्‍टर बॉईज’ चित्रपटाने. हृषिकेश जोशी सर्वोत्कृष्ट नायक (पोश्‍टर बॉईज ) तर सर्वोत्कृष्ट नायिका सोनाली कुलकर्णी (अगं बाई अरेच्चा २) ठरली. वैभव मांगले यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (टाईमपास २) तर नेहा जोशी हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (पोश्‍टर बॉईज) पुरस्कार पटकावला. समीर पाटील यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा (पोश्‍टर बॉईज) पुरस्कार मिळवला तर समीर पाटील, चारुदत्त भागवत (‘पोश्‍टर बॉईज’) यांना सर्वोत्तम लेखनासाठी गौरवण्यात आले.
‘ऑल द बेस्ट २’ठरले सर्वोत्कृष्ट नाटक...
नाटक विभागातील पुरस्कारांमध्ये ‘ऑल द बेस्ट २’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान देवेंद्र पेम यांनी ‘ऑल द बेस्ट २’साठी पटकावला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकासाठी मंगेश कदम यांना प्रदान करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लीना भागवत यांना ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता भूषण कडू (सर्किट हाऊस) तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पूजा नायक (पहिलं पहिलं) ठरली. विशेष लक्षवेधी अभिनेत्याचा ज्युरी पुरस्कर मयुरेश पेमला (ऑल द बेस्ट २) मिळाला.
लेखक गंगाराम गवाणकर यांना जीवन गौरव
पुनरूज्जीवित नाटकाच्या पुरस्कारांमध्ये ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाने बाजी मारली. याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून भरत जाधव तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाकरीता केदार शिंदे याची निवड करण्यात आली. प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष पुरस्कारांमध्ये हास्यकवी रामदास फुटाणे आणि लावणीसाठी योगदान देणाऱ्या कांताबाई सातारकर यांचा गौरव करण्यात आला.
स्टार्सच्या परफॉर्मन्सेसनी लागले चारचाँद...
हास्य-विनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री व मकरंद अनासपुरे यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली. नेहा पेंडसे, मानसी नाईक आणि पूजा सावंत या अभिनेत्रींच्या दिलखेचक नृत्यविष्काराने सर्वांची मने जिंकली. मयुरेश पेम आणि कोरिओग्राफर सॅड्रीकच्या नृत्याच्या जलव्याने चांगली रंगत आणली. सचिन पिळगांवकर यांनी श्रुती मराठे, संस्कृती बालगुडे यांच्या साथीने किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरत या सोहळ्यात अनोखे रंग भरले. विजय पाटकर आणि आरती सोळंकी धमाल गाण्यावर बेधुंद नाचले. तर संतोष पवार, कमलाकर सातपुते, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव यांच्या बहारदार स्किटसने उपस्थितांना मनसोक्त हसवले.
धम्माल विनोदी परफॉर्मन्सेस, आकर्षक नृत्याविष्कार आणि दिग्गजांच्या उपस्थितीने सजलेला ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी १२ जुलैला सायं. ६.३० वा. झी टॉकीजवर प्रक्षेपित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळ्याची खास क्षणचित्रे...