आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने होणार सुनील बर्वेंच्या हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुनील बर्वे यांनी पाच वर्षांपूर्वी हाती घेतला. मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगड' ठरलेली आणि गाजलेली काही चांगली नाटके 'हर्बेरियम' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आली. आजच्या तरुण पिढीला या नाटकांची माहिती व्हावी आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके पुन्हा पहाता यावी, या उद्देशाने सुनील बर्वे यांनी हा उपक्रम राबविला होता. या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
 
नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाट्यरसिकांनी पहाटे लावलेल्या रांगा या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच नाटकांचा ‘हर्बेरियम’ उपक्रम २०१२ मध्ये संपल्यानंतर अभिनेते सुनील बर्वे नवीन काय घेऊन येणार याकडे नाट्यरसिकांचे ही डोळे लागले होते. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही उत्सुकता संपणार असून 'हर्बेरियम'च्या दुसऱ्या नव्या पर्वाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर ‘हर्बेरियम' पुन्हा एकदा रसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने या नव्या पर्वाची सुरुवात होईल. या नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत. या पर्वातही पाच नाटकं असून विजय केंकरे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे या मातब्बर दिग्दर्शकांची नाटकं या पर्वात सादर होणार आहेत. मुंबई व महाराष्ट्रात या नाटकांचे प्रयोग रंगतील.
 
‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी या कलावंतांसह धनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव हे दोन नव्या दमाचे गायक कलावंत भूमिका करणार आहेत. याचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची असणार आहे. संगीत राहुल रानडे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. शनिवार 23 सप्टेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दुपारी ४.०० वाजता रंगणार आहे.
 
पुढे वाचा,  'हर्बेरियम'च्या दुस-या पर्वाविषयी काय म्हणाले सुनील बर्वे..
बातम्या आणखी आहेत...