आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होम मिनिस्टर\'मुळे घडली होती ताटातूट झालेल्या दोन बहिणींची भेट, पाणावले होते घरी बसलेल्या प्रेक्षकांचेही डोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर भावोजी म्हणून महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे लाडके आहेत. या कार्यक्रमाला आज 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर 2004 रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास आजही अविरत सुरु आहे.
 
एवढ्या वर्षांच्या प्रवासातील काही क्षण आदेश बांदेकर यांच्यासह तमाम प्रेक्षकांसाठीसुद्धा अविस्मरणीय ठरले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दुरावलेली कुटुंब, नाती जवळ आलेली आपण पाहिली. याच कार्यक्रमातून अनेक वर्षांपासून दुरावलेल्या दोन बहिणींची भेट घडून आली. हा प्रसंग आदेश बांदेकर यांच्यासह तमाम प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत. प्रिया आणि प्रियांका या दोन बहिणी लहानपणीच दुरावल्या होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लग्नात या बहिणींची भेट करून देण्यात आली होती. 

प्रिया दोन वर्षांची तर प्रियांका आठ वर्षांची असताना दोघींची ताटातूट झाली होती. या दोन बहिणींचा एक भाऊसुद्धा आहे. तो महिन्याभराचा असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. तर वडील दारुच्या आहारी गेले होते. त्यांचे 72 वर्षीय आजोबा या तिन्ही मुलांचा सांभाळ करत होते. पण त्यांना वयामुळे पुढे या तिन्ही लेकरांचा सांभाळ करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी थोरली प्रियांका  आणि भावाला दोन वेगवेगळ्या कुटुंबांना दत्तक दिले तर दोन वर्षांच्या प्रियाला सिंधूताई सपकाळ यांच्या ममता अनाथ आश्रमात दाखल केले. काही दिवसांनी आजोबांचे निधन झाले. 

'होम मिनिस्टर'च्या 'स्वप्न गृहलक्ष्मीचे' या स्पेशल भागांत प्रियांका तारळकर तिच्या भावी पतीसोबत सहभागी झाली होती. याच कार्यक्रमात प्रियांकाने बालपणी तिच्यासोबत घडलेली घटना आदेश बांदेकर यांच्यासोबत शेअर केली होती. गेल्यावर्षी म्हणजे 6 फेब्रुवारी 2016 रोजी हा एपिसोड प्रसारित झाला होता. तर दोन दिवसांनी म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी प्रियांकाचे लग्न होते. लग्नात जमलं तर मी नक्की येईल आणि येताना तुझ्या बहिणीला घेऊन येईल, असे आदेश भावोजींनी प्रियाकांला सांगितले होते. 

विशेष म्हणजे हा एपिसोड सिंधूताईंनी पाहिला होता आणि त्यांनी आदेश बांदेकरांना फोन करुन प्रियांकाची धाकटी बहीण त्यांच्या आश्रमात लहानाची मोठी होत असून आता सहावीत शिकत असल्याचे सांगितले. मग काय आदेश बांदेकर प्रियांकाच्या हळदीच्या दिवशी तिच्या धाकट्या बहिणीला घेऊन पोहोचले. कित्येक वर्षांनी ताटातूट झालेल्या बहिणींची भेट या कार्यक्रमाने घडवून आणली. त्यावेळी प्रियांका आपल्या बहिणीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. तिथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. स्वतः आदेश बांदेकरांचा कंठ दाटून आला होता. हा एपिसोड बघताना घरी बसलेल्या प्रेक्षकांचेही डोळे पाणावले होते. लग्नमंडपात अक्षतांऐवजी आनंदाश्रुंचा सडा पडला होता.    

बघा, दोन बहिणींची भेट कशी घडून आली, हे दाखवणारे झी मराठी वाहिनीचे खास व्हिडिओज... 
बातम्या आणखी आहेत...