(केक कापून यशाचा आनंद साजरा करताना मालिकेतील कलाकार)
झी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने नुकताच यशस्वी 500 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने सेटवर सेलिब्रेशनचे वातावरण होते. या सेलिब्रेशनसाठी एक खास केक मागवण्यात आला होता. सर्व कलाकारांनी जल्लोषात यशाचा आनंद साजरा केला.
15 जुलै 2013 रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आणि बघता बघता वेगळा विषय आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही मालिका यशोशिखराव पोहोचली. या मालिकेतील शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली.
‘होणार सून मी ह्या घरची' ही निर्माता म्हणून मंदार देवस्थळींची पहिलीच मालिका आहे. एक दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरल्यानंतर मंदारने निर्माता बनून ही मालिका आणली आणि अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरली. सध्याची छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक तब्बल सात वर्षांनी 'झी मराठी'वरील मालिकेत झळकला.
सध्या या मालिकेत गोखले कुटुंबाच्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली आहे. पिंट्याने श्रीच्या चेह-याला काळे फासल्याने गोखले कुटुंब आणि जान्हवीच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच भागीरथीबाईंना हृद्यविकाराचा झटका आला आहे. इतकेच नाही तर जान्हवीकडे गोड बातमी असूनदेखील ती घरच्यांकडे हा आनंद व्यक्त करु शकत नाहीये. पिंट्या तुरुंगात असून श्रीने त्याला मदत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जान्हवी फारच खचली आहे. आता या सर्व अडचणींचा सामना ती कशी करणार?, श्री आणि जान्हवी यांच्यात दुरावा वाढतच जाणार का? या प्रश्नांची उत्तरे
आपल्याला मालिकेच्या येणा-या भागांमध्ये मिळणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मालिकेने 500 भागांचा यशस्वी टप्पा गाठल्यानंतर कलाकारांनी केलेल्या सेलिब्रेशनची खास झलक...