फरिदा जलाल, रेशम टिपणीस, भावना बलसावर या मोठ्या स्टारकास्टचा समावेश...प्रेक्षकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारी श्री आणि जान्हवी या जोड गोडीची झी मराठीवरील "होणार सून मी या घरची' ही मालिका आता हिंदी प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी सज्ज झाली आहे. झी टीव्हीवर "सतरंगी ससुराल' नावाने ही मालिका डिसेंबरपासून सुरू झाली आहे. फरिदा जलाल, भावना बलसावर, रेशम टिपणीस यासारख्या मोठ्या स्टारकास्ट असणाऱ्या या हिंदी अवतारमध्ये "होणार सून..'चा मूळ गाभा मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
"होणार सून मी...'प्रमाणेच यातील नायक विहानला सहा आई आणि एक आजी आहे. आजीच्या भूमिकेत फरिदा जलाल आहेत. हिंदी मालिकेवर मराठीची छाप पडू नये म्हणून संपूर्ण कथानक दिल्लीत घडताना दाखवण्यात आले आहे. पूर्णेंदू शेखर, नंदिता मेहरा, भैरवी रायचुरा आणि गजरा कोठारी हे मालिकेचे निर्माते आहेत. पटकथा दिग्दर्शन पूर्णेंदू शेखर यांचे आहे.
मराठीचा हिंदी रिमेक
झी टीव्हीचे प्रोग्रामिंगहेड नमित शर्मा म्हणतात, 'झी मराठीवर "होणार सून...' मालिका लोकप्रिय ठरत आहे. श्री आणि जान्हवीची जोडी घराघरांत पोहोचली आहे. एका नायकाच्या सात आई आणि नायिकेच्या सात सासू ही कल्पनाच वेगळी आहे. हा हिंदी रिमेक प्रेक्षकांना नक्की आवडेल.'