आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्यादिवशी पाऊस पडला नसता, तर मी \'किल्ला\' चित्रपट बनवला नसता\'- दिग्दर्शक अविनाश अरूण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटात पाऊस पडतो. तेव्हा तो खोटा पाऊस असतो. हे आता आपल्या सगळ्यांनाच माहित झालंय. पण दिग्दर्शन क्षेत्रात ‘किल्ला’ या चित्रपटाने पहिल्यांदा पाऊल ठेवत असलेल्या, अविनाश अरूणला मात्र आपल्या सिनेमासाठी खराखूरा पाऊसच हवा होता. त्यासाठी त्याने किल्लाचे चित्रीकरण जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांमध्ये केले आहे. खरं तर कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग आजकालच्या काळात महिना ते दिड महिना होते. मराठी चित्रपटाला तर बजेट नेहमीच कमी असते. त्यामुळे १५ ते २० दिवसात शुटिंग पूर्ण करण्यावर निर्माता दिग्दर्शक भर देतात. पण नावाजलेल्या अनेक चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी करणा-या अविनाशला स्वत:च्या पहिल्या चित्रपटासाठी चांगला दृश्यात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी मात्र खरा पाऊसच हवा होता. एवढंच नाही तर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला नाही, तर शुटिंग बंद करीन, मी किल्ला चित्रीतच करणार नाही. एवढी टोकाची भूमिका त्याने घेतली होती.
याबद्दल अविनशला विचारल्यावर तो सांगतो,”हो, चित्रपटातला खूप महत्वाचा सिन होता, जो मी पहिल्या दिवशी शूट करणार होतो. आणि त्या सिक्वेन्ससाठी मला फक्त पाऊसच नाही, तर वादळी वा-यासह पाऊस पडायला हवा होता. ज्यासाठी मी विजयदूर्गाला गेलो होतो. या सिनमध्ये फक्त अर्चित देवधर असणार होता. त्यामुळे अर्चितसह मी फक्त आठजणांचं युनिट घेऊन गेलो होतो. आणि मी तिथे पोहोचल्यावर पाऊसच पडला नाही. आणि त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होतो. कारण तो चित्रपटातला सर्वात महत्वाचा सिन होता. पावसाची अख्खा दिवस वाट पाहिली, आणि पाऊस न पडल्याने दिवस अक्षरश: फुकट गेला होता. पहिल्या चित्रपटाच्या पहिल्या सीनचे असे बारा वाजताना पाहून टेन्शनने मला रात्री तापही भरला. उद्या पाऊस पडला नाही तर मी फिल्मच करणार नाही एवढा टोकाचा निर्णयही मी रात्री कंटाळून उशीरा झोपताना घेतला होता.
आणि चक्क पहाटे चार वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस एवढा कोसळू लागला, की आम्ही जिथे राहत होतो, तिथपर्यंत समुद्राच्या लाटा येऊ लागल्या. आणि मी ते पाहून उठल्यावर ब्रश करायचेही विसरलो. पुढचा मागचा काहीही विचार न करता कॅमेरा घेतला, आणि पळत समुद्रावर गेलो. मी तो मला हवा असलेला सिक्वेन्स चित्रीत केला.”
“मला आर्टिफिशीअल पाऊस नको होता. मोठाच्या मोठा कोकणचा समुद्र किनारा मला दाखवायचा होता. वा-याने हलणारी नारळाची झाडं, किल्याच्या बुरूजापर्यंत जाणा-या लाटा असं वादळी वातावरण मला हवं होतं.आणि शेवटी मला हवा असलेला सिक्वेन्स मिळाला. तो पहिला सिन मनासारखा झाल्यावर जणू एक सकारात्मक उर्जा माझ्यात येत गेली, आणि एक चांगली फिल्म बनली.”
अविनाश अरूणच्या ‘किल्ला’ चित्रपटाचे बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये खूप कौतूक झाले आहे. आता या शुक्रवारी रिलीज होणारी ही फिल्म बर्लिनच्या परिक्षकांप्रमाणेच भारतातल्या प्रेक्षकांना आवडेल अशी अविनाशची अपेक्षा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सिनेमांतील कलाकारांची खास छायाचित्रे...