आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janiva Marathi Film On Aruna Shanbag Rajesh Ranshinge

अरुणा शानबागची बातमी ऐकताना सुचला 'जाणिवा' -दिग्दर्शक राजेश रणशिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्व स्तरातील नव्या पिढीच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. एखादी घटना घडली त्या ठिकाणी मदत करण्याऐवजी त्याचे चित्रीकरण करून व्हॉट्सअॅपवर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.
मानवी संवेदना संपल्यासारख्या वाटत आहेत आणि हीच बाब मी माझ्या नव्या 'जाणिवा' चित्रपटात दाखवली आहे. ४२ वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांच्याबद्दल एफएमवर विशेष वृत्त ऐकताना या चित्रपटाचा विषय सुचल्याचे 'जाणिवा' चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश रणशिंगे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

छोट्या पडद्यावर जवळ-जवळ २२ हजार तासांचे एपिसोड दिग्दर्शित करणा-या राजेशचा "जाणिवा' हा पहिलाच मराठी चित्रपट असून या चित्रपटातून महेश मांजरेकरचा मुलगा सत्या रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. चित्रपटाची ध्वनिफीत नुकतीच सलमान खानच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाला राजेश उपस्थित नव्हता. राजेशने सांगितले, मी हैदराबादला एका कामानिमित्त असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही.

एक दिवस मी गाडीतून जात असताना एफएम चॅनेल ऐकत होतो. रेडिआे जॉकीने अरुणा शानबागची बातमी सांगितली आणि त्यावर खूप वेळ त्या जॉकीने चांगली मांडणी करत अरुणाची वेदना मांडली. ते ऐकत असताना मला जाणवले की, अरुणाची कथा ४२ वर्षांपूर्वीची आहे. मात्र, त्यावेळीही नागरिकांच्या संवेदना जाग्या नव्हत्या. आजही आपण जेव्हा बाहेर बघतो तेव्हा मानवी जाणिवाच संपल्याचे हृदयद्रावक प्रसंग दररोज दिसतात. तेव्हा माणुसकी संपली का असा प्रश्न मनात उभा राहतो आणि हाच प्रश्न घेऊन मी जाणिवाची निर्मिती केली.

सत्याचे चांगले काम : सत्या मांजेरकरबाबत राजेश म्हणाला, मला इंट्रोव्हर्ट मुलगा हवा होता. जो कमी बोलतो परंतु त्याच्या मनात खूप काही सुरू असते. सत्याला मी खूप काळापासून पाहत असल्याने तो जसा आहे तसाच मुलगा मला हवा होता. मी महेश मांजरेकरला विचारले आणि त्याने लगेच सत्याला विचारून परवानगी दिली. सत्याने खूपच चांगले काम केले आहे.

रेणुका शहाणेची दर्जेदार भूमिका
रेणुका शहाणेने वकिलाची उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. मिलिंद विष्णू, राजेश रणशिंगे रेश्मा विष्णू आणि स्मरण जैन यांची प्रस्तुती असलेल्या ‘जाणिवा’चे लेखन राजेशनेच केले आहे. किशोर कदम, वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अगरवाल, किरण करमरकर, अतुल परचुरे, उषा नाडकर्णी यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
छायाचित्र: जाणिवाचा दिग्दर्शक राजेश रणशिंगे जाणिवाच्या ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्यात सलमान खानने हजेरी लावली. महेश मांजरेकर, सलमान खान, सत्या व सचिन.