आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जो जिता वही सिकंदर'नंतर आता मराठीत 'जीत'मध्ये सायकलिंगचा थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जीत' चित्रपटातील एका दृश्यात अभिनेता भूषण प्रधान आणि अन्य)

अलिकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत जरी नवनवीन प्रयोगांना वेग आला असला तरी आजवर मराठीत अभावानेच पाहायला मिळणारा थरार 'जीत' या आगामी चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. एकेकाळी मराठी चित्रपट कुस्तीच्या रंगात रंगलेला पाहायला मिळायचा. स्थल कालपरत्वे मराठी चित्रपट कात टाकत असून कधीही न दिसलेली सायकल रेस 'जीत' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

प्रीतपाल सिंग शेरगील निर्मित आणि वाईल्ड रोझ फिल्मची प्रस्तुती असलेल्या 'जीत' चित्रपटात कथानकाच्या मागणीनुसार एका सायकल चॅम्पियनशिपचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. पुण्यातील भंडारा घाटामध्ये चित्रित झालेली ही सायकल रेस उत्कंठावर्धक आणि थरारक बनली आहे. यानिमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटात निसर्गरम्य तरीही अवघड अशा भंडारा घाटाचा समावेश करण्यात आल्यामुळे एका नवीन लोकेशनमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

'जीत' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधान आणि सचिन दाणाई यांच्यावर ही सायकल रेस चित्रीत करण्यात आली. या रेसमध्ये राज्यस्तरीय सायकल रेसर्सनी सहभाग घेतल्याने यातील रोमांच अधिक वाढला आहे. एकीकडे एक्स्पर्ट सायकल रेसर तर दुसरीकडे पडद्यावर अभिनय करणारे कलाकार... तीव्र चढ-उतार असलेला निमुळता रस्ता... एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी... पावसाच्या वातावरणामुळे निसरडा झालेला रस्ता... अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी... अशा प्रतिकूल वातावरणात या वेगवान रेसचं चित्रीकरण करण्यात आल्याने ही रेस अधिकच रोमहर्षक बनली आहे. या रेससाठी 'जीत'चे दिग्दर्शक सागर चव्हाण आणि कॅमेरामन मनोज शॉ यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली.
जाणून घ्या, कसा होता भूषण प्रधानचा सायकल रेसचा अनुभव...