‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील माई
‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे. आणि मालिकेत देसाई कुटूंबावर
आपली मायेची पांघर घालणा-या माईंशी गप्पा मारायला सुरूवात केल्यावर तर मालिकेतलं बदलणारं विश्वच उलगडलं. सुकन्या कुलकर्णी अनेकवर्षांपासून मालिकाविश्वात काम करतायत.
सुकन्या कुलकर्णी म्हणतात, “ ‘ससुराल सिमर का’ पाहत होते, आणि लक्षात आलं, ‘अरे ही कथा कुठून, कुठे पोहोचलीय?’ सुरूवात काय झाली, आणि आता काय ट्रॅक चाललाय? एक प्रेक्षक म्हणून अस्वस्थ झाले. पण मग लक्षात आलं, की हिच मालिका नाही, तर आज हिंदी-मराठीत अशा अनेक मालिका भरकटलेल्याच आहेत. मालिकेतल्या नायिकेची चार-चार लग्न काय लावली जातात. आणि उगाच सासू- सूनेत मीठ किती घालायचं ह्यावर भांडणं होतात, कुठे जावा-जावांमध्ये तर कुठे दोन बहिणींमधले हेवेदावे दिसतात. काही नाही तर एका पुरूषाच्या आयुष्यात दोन बायका येऊन उगाच मालिकेत तिढा दाखवला जातो. या आणि अशा अनेक अतर्क्य गोष्टी ज्या आपल्या ख-या आयुष्यात होत नाहीत, त्या पाहायला मिळतायत.”
त्या पूढे म्हणतात, “एकिकडे आपले चित्रपट वास्तववादी होऊ लागलेत. तर मालिका अतिरंजित होऊ लागल्यात. पण नशीबाने जुळून येती, आभाळमाया ह्या मालिका कधीच ह्या वाटेने गेल्या नाहीत. मालिकेत नक्की काय वळण येणार, हे अगोदरच प्रॉडक्शनहाऊसने ठरवलेले होते. एखादा ट्रॅक लोकांना आवडतोय, ह्या नावाखाली काहीही वास्तवापासून फारकत घेणारे दाखवले गेले नाही.”
‘जुळून येती..’चे वैशिष्ठ्य सांगताना त्या म्हणतात, “जुळून येती रेशीमगाठी’ लोकांना आवडली, ह्याचे कारण ह्या कुटूंबातली साधी माणसं. बड़ेजावं मिरवणं, रोज सकाळी उठून प्रॉपर्टीविषयीच्या बाता मारणे असे ह्या मालिकेत कधीच झाले नाही. ही मध्यमवर्गीय माणसं होती. त्यांचे विषयही महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरात चर्चिले जाणारेच होते. रूसवे-फुगवेही तसेच होते, जसे तुमच्या-आमच्या घरात भांड्याला भांड लागल्यावर होतात. मालिकेतली माणसं छोट्या छोट्या रागांवरून हातात पिस्तुल घेऊन उभी राहणारी नव्हती.”
सुकन्या कुलकर्णींनी भारतीय टीव्ही विश्वातला पहिला डेलीसोप ‘शांती’ केला होता. ‘शांती’ मालिकेच्या विषयीच्या आठवमी जागवताना त्या म्हणतात, “‘शांती’ मालिका करताना, पूढील दोन वर्ष त्या मालिकेत काय होणार ह्याचे जाडजूड स्क्रिप्ट अगोदरच तयार होते. त्याची वाचनं झाली होती. कोण कसे बोलणार हे नक्की होते. शुटिंगचे दोन वर्षांची संहिता अगोदरच तयार होती. एखाद्या दिवशी माझे शुटिंग नसेल, तरीही त्यादिवसाच्या सिक्वेन्सचे स्क्रिप्ट सूध्दा माझ्या घरी पोहोचायचे. एवढेच नाही आभाळमायावेळी सुध्दा अगदी असंच झालं होतं. मालिकेने अचानक लिप घेतला नव्हता. माझी लहानमुलं दाखवायचे आणि त्या मुलांना मोठ झाल्यावरचे मालिकेत कोणते सिक्वेन्स दाखवायचे ह्याविषयी विनय आपटे ह्यांचे अगोदरच प्लॅनिंग होते. “
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सुकन्या कुलकर्णी सांगतायत, जुळून येती मालिकेची कशी झाली रंगीत तालीम