आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Album: पहिल्याच भेटीत मयुरीच्या प्रेमात पडला होता आशुतोष, अशी आहे दोघांची लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. 18 सप्टेंबरपासून तुझं माझं ब्रेकअप ही मालिका रात्री साडे आठ वाजता प्रक्षेपित होणारेय. त्यामुळे याच वेळेत सुरु असलेली 'खुलता कळी खुलेना' ही मालिका आपला निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावर्षी ही मालिका सुरु झाली आणि अल्पावधीतच तिला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. मोनिका-विक्रांत-मानसी या तीन मुख्य व्यक्तिरेखांभोवती ही मालिका गुंफण्यात आली आहे. मोनिकाच्या भूमिकेला ग्रे शेड आहे, तर मानसीने अतिशय सोज्वळ रुपात पडद्यावर दिसतेय. अभिनेत्री मयुरी देशमुख या मालिकेत मानसी हे पात्र वठवत आहे. मानसीने नुकतीच वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस होता. 
 
छोट्याच नव्हे तर रुपेरी पडद्यावर झळकली आहे मयुरी.... 
3 सप्टेंबर 1992 रोजी मयुरीचा जन्म झाला. मुंबई आणि विशाखापट्टणम येथे तिचे शिक्षण झाले आहे. तिने अॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई आणि रिशी विद्यालय गुरुकुल, विशाखापट्टणम येथून शिक्षण घेतले आहे. कॉलेज जीवनात अनेक नाटकांमधून तिने कामं केली. 'प्लेझंट सरप्राईज' या व्यावसायिक नाटकात सौरभ गोखले आणि प्राजक्ता माळीसोबत ती झळकली आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि आता मयुरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मयुरी एका छोटेखानी भूमिकेत रुपेरी पडद्यावरसुद्धा झळकली आहे. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमात मयुरीने पत्रकाराची भूमिका वठवली आहे.
 
खासगी आयुष्यात गवसला आहे जोडीदार.... 
'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मयुरी साकारत असलेले मानसी हे पात्र विक्रांतच्या प्रेमात आहे, पण अद्याप तिने त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केलेले नाही. खासगी आयुष्यात मात्र मयुरीला तिचे प्रेम गवसले आहे. होय, मयुरी खासगी आयुष्यात विवाहित असून गेल्याचवर्षी तिचे लग्न झाले आहे. मागील वर्षी म्हणजे 20 जानेवारी 2016 रोजी मानसी विवाहबद्ध झाली आहे. आशुतोष भाकरे हे मयुरीच्या जोडीदाराचे नाव आहे.
 
मयुरी-आशुतोषचे आहे अरेंज्ड मॅरेज... 
मयुरीच्या वडिलांच्या रिटायर्टमेंटच्या निमित्ताने आयोजित एका पार्टीत आशुतोषने पहिल्यांदा मयुरीला पाहिले होते. बघताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. एका मुलाखतीत मयुरीने तिचे आणि आशुतोषचे लग्न नेमके कसे जमले, याविषयी सांगितले होते. मयुरीने सांगितल्यानुसार, त्या पार्टीत आशुतोष त्याचे मामा आणि वडिलांसोबत आला होता. येथेच त्याने तिला पहिल्यांदा पाहिले होते. एखादा मुलगा पार्टीच्या निमित्ताने आपल्याला बघायला आला आहे, हे मयुरीला मात्र ठाऊकच नव्हते. पार्टीच्या दुस-या तिस-या दिवशी तिच्या कुटुंबीयांनी तिला आशुतोष आवडला का? हा प्रश्न केला. पण याविषयी पुर्वकल्पना नसल्याने मयुरीला आशुतोष कोण हे समजलेच नाही. शिवाय तिने सध्या तरी लग्नाचा विषय नको, म्हणून हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण एकदा मुलाला भेटून घे आणि नंतर काय तो निर्णय घे, असे घरच्यांनी तिला समजावून सांगितले. आशुतोषला फक्त एकदाच भेटेन असे मयुरीने तिच्या आईवडिलांना सांगितले होते. एका तासात भेटून परत यायचं असंच मयुरी आशुतोषला भेटायला जाताना ठरवून गेली होती. पण पहिल्याच भेटीत तब्बल पाच तास मयुरीने त्याच्याशी गप्पा मारल्या. पहिल्याच भेटीत आशुतोषने लग्नाचा निर्णय तूच घे, असे म्हटले. पहिल्याच भेटीत आशुतोषने मयुरीवरच्या प्रेमाची कबुली दिली. मयुरीलादेखील आशुतोष भावला आणि भेटीच्या सात ते आठ महिन्यांतच दोघांचे लग्न झाले.  
 
अभिनय क्षेत्रात आहे मयुरीचा नवरा...
आशुतोषसुद्धा अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तीन मराठी सिनेमांमध्ये आशुतोष झळकला आहे. 'इचार ठरला पक्का', 'बायको असावी अशी' आणि 'भाकर' या सिनेमांमध्ये आशुतोषने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.विशेष म्हणजे आशुतोषची मध्यवर्ती भूमिका असलेल्या 'भाकर' या सिनेमाचे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमिअर झाला होता. आता आशुतोष 'ब्लँकेट' या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. आशुतोष मुळचा नांदेडचा आहे. औरंगाबाद येथे मयुरी आणि आशुतोषचे थाटात लग्न झाले होते. 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मयुरी आणि आशुतोषचा वेडिंग अल्बम दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मयुरी-आशुतोषची साखरपुडा आणि लग्नाची खास छायाचित्रे...

फोटो सौजन्यः Dream Catchers co. आणि मयुरी देशमुखचे फेसबुक पेज 
बातम्या आणखी आहेत...