रेवाच्या लग्नासाठी माजघरातली मंडळी अकोल्याला पोहोचलीयत. पण अकोल्याला पोहोचल्यापासून त्यांची तारांबळ उडणं जे सुरू आहे, ते रेवाच्या लग्नातही पाहायला मिळणार आहे. राकेश-रेश्माचं सुरळीत सुरू आहे, हे दाखवण्याची धांदल तर सुरूच राहणार आहे. शिवाय आपल्या स्वभाववैशिष्ठ्यानूसार माजघरातली मंडळी लग्नघरात गडबड करताना दिसणारच आहे.
सुजय म्हणजेच सुव्रत जोशी सांगतो, “रेश्मा आणि राकेशचं तुटलेलं लग्न हा जरी गंभीर प्रश्न असला, तरीही त्या प्रश्नावर पांघरूण घालताना आम्ही ह्याअगोदरही गडबड केलीय. श्याम जो आमच्या घरी चोर म्हणून आला होता, तो नंतर आमचा मित्र झाला. आणि तो ही लग्नात आलाय. त्याच्याशी मी राकेश म्हणून नेहमीच भेटत आलोय. रेश्माच्या बाबांशी मी राकेश म्हणून नेहमीच बोलत आलोय. राकेशचे वडिल मला ट्रव्हल एजंट समजतात. अशा सगळ्या गडबडगुंड्यात आम्हांला रेवाच्या लग्नात स्वत:लाच सावरायचंय. त्यामुळे बाकी लग्नांसारखं हे लग्न नाहीये. बरं, माजघरातल्या लोकांना कधीच रीती-रिवाज माहित नाहीत. अशी मंडळी लग्नात विधी चालू असताना काय करतात, हे पाहणंही मजेशीर आहे.”
एरवी माजघरात विस्कळीत राहणा-या मनमौजी मजघरवासियांना अकोल्याला लग्नात जर सभ्यपणे वावरावं लागलंय. सगळ्या व-हाडी मंडळींसारखेच आशु, सुजय आणि कैवल्यने फेटे पारंपरिक कपडे घातले होते. तर मिनल आणि एना सुध्दा साडीत वावरत होत्या. ह्यावर पूजा ठोंबेर सांगते, “मॉडर्न एनाला नेहमी प्रेक्षक साडीत पाहत नाहीत. पण एना फॅशन डिझाइनर असल्याने कपडे कसे कॅरी करावे, हे तिला चांगलं ठावूक आहे. त्यामूळे साडीमूळे ती अजिबात अवघडलेली नसेल. साडी नेसली म्हणून एनाने मॅच्युअर्डली वागणं कधीच शक्य नाही. गोंधळ घालणं, हे एनाचं स्वभाववैशिषठ्य आहे. त्यामूळे ह्या लग्नाच्या गोंधळात ती अजूनच गडबड करणारं, हे निश्चित आहे. मला व्यक्तिश: साडी नेसायला आणि नटायला खूप आवडतं. त्यामूळे हा एपिसोड तर मी खूप एन्जॉय केलाय.”
एनाशिवाय आशूही धांदरटच आहे. त्यामूळे आशूने धांदरटपणा केला नाही तरच नवल. आशू सांगतो, “आम्ही एक तर सगळ्यांशी आमच्याबद्दल खोटं बोलत आलेले आहोत. रेश्माच्या वडिलांना मी कुरीयरवाला आहे, असं वाटतंय. तर रेवाला असं वाटतंय की मी निशाचा नवरा आहे. श्यामला असं वाटतंय की सुजय हा रेश्माचा नवरा आहे. ह्या गोंधळामूळेच मला अकोल्याला यायचं नव्हतं. एक तर मला पोटात काही लपवता येत नाही. त्यामूळे एपिसोड पाहणा-या लोकांना जरी मजा येणार असली. तरीही माजघरातल्या आम्हां मंडळींची चांगलीच तारांबळ उडणार आहे.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मीनल, कैवल्य आणि रेश्मा सांगतायत, लग्नातला गोंधळ