(फाइल फोटोः दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे)
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी सिनेसृष्टीत दीड ते दोन दशके अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणा-या या अभिनेत्याने 16 डिसेंबर 2004 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मूत्रपिंडाचा विकाराने वयाच्या 50व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डेंचे निधन झाले. या हास्यसम्राटाला जाऊन दहा वर्षांचा काळ लोटला. मात्र
आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्वांचा लाडका लक्ष्या आजही आपल्यातच आहे.
3 नोव्हेंबर 1954 रोजी जन्मलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली होती. 'टुरटुर' हे त्यांचे पहिलेच नाटक जबरदस्त हिट ठरले होते. त्यानंतर आलेले 'शांतेचे कार्ट चालू आहे', 'बिघडले स्वर्गाचे द्वार', 'कार्टी चालू आहे' ही नाटकेही यशस्वी ठरली. लक्ष्मीकांत यांनी 1985 मध्ये 'लेक चालली सासरला' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांचे आलेले धुमधडाका (1985), अशी ही बनवाबनवी (1988), थरथराट (1989) सह अनेक सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले. अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे लक्ष्मीकांत यांचे ट्युनिंग कमालीचे होते.
सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैंने प्यार किया' या सिनेमाद्वारे त्यांनी 1989 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (1991), बेटा (1992) आणि हम आपके है कौन (1994) हे हिंदी सिनेमे खूप गाजले.
असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डेंना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवणीतील छायाचित्रे...