आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'M H 02 DL 5262\' Drama It\'s An Excellent Experience

अप्रतिम नाट्यानुभव \'\'MH 02 DL 5262\'\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : ''MH 02 DL 5262'' या नाटकाच्या एका दृश्यात माधवी कुलकर्णी आणि शशांक इंगळे)
मिलिंद बोलीक या संवेदनशील लेखकाच्या 'संकेत' या कथेचे रुपांतर एका दीर्घांकात करुन त्याचे सादरीकरण पृथ्वीच्या अविष्काच्या महोत्सवात बघण्याचा नव्हे अनुभवण्याचा योग आला आणि मन तृप्त झाले. आधी पृथ्वीचा माहोल स्टायलिश कपड्यातील तरुण मंडळी मग मध्येच मराठीचा गाजलेला नट मकरंद देशपांडेची एन्ट्री. आत जाऊन बसता तोवर रत्ना पाठक गुपचुप येऊल बसलेली!
काकडे काकांनी आवर्जुन स्वागत करणं म्हणजे आपण कुणीतरी महत्त्वाचे रसिक आहोत, असा आपलाही समज. कथा न वाचलेली पण 'समुद्र' ही बोकीलांच्याच कादंबरीचा नाट्याविष्कार म्हणजे काहीतरी 'ऑफ बीट' बघायला मिळणार याची खात्री होतीच.
मध्यमवर्गीय घरातील स्वयंपाक घर, एकाच कोप-याच झोपण्याची व्यवस्था, कपाट, खुर्च्या, असे साधे नेपथ्य. उत्तम प्रकाशयोजना आणि अप्रतीम संगीत आणि पार्श्वसंगीत. प्रौढत्वाकडे झुकणारी आपल्या कुमारवयीन मुलाला घेऊन एकटी राहणारी ही आई आता आयुष्यात नव्याने आलेल्या प्रेमाचा मनसोक्त अनुभव घेऊ इच्छित आहे. एकीकडे आई म्हणून असणा-या आपल्या कर्तव्यांमध्ये ती कुठेही कमी पडत नाही. पण आता नव्याने निर्माण झालेल्या या नव्या नात्याकडे मन आणि शरीर ओढ निर्माण करीत आहे. आतातरी ते उपभोगण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले पाहिले ही तिची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी तिला हवा आहे, फक्त तासाभराचा 'एकांत' आणि तो मिळवण्यासाठी ती अधीर झाली आहे.
छान तयार होऊन मुलाने शाळेतून यायची वाट बघत ती घरात आतुरतेने वावरत आहे आणि शाळेतून परत आलेला हा कुमारवयीन मुलगा कधी एकदा मित्रांसोबत खेळायला जातो आणि आपण आपल्या प्रियकराला घरात बोलावून आनंद लुटतो, तो अनुभवायला ती अधीर झाली आहे.
नानाप्रकारे त्याला विनवीत त्याला मनवीत, खायला देऊन इतर प्रलोभने दाखवून फक्त तो एक तासाचा एकांत मिळविणे हे एकच तिचे उद्दिष्ट आहे. एरवी एका पायावर उड्या मारत खेळायला जाणारा मुलगा आज मात्र आळमटळम करतोय. त्याला आज कंटाळा आलाय, मूड नाहीये. कधी नव्हे त्याला अभ्यास आठवतो आहे. नाना प्रकारच्या कसरती करीत तो फक्त बाहेर जायचं टाळतोय.
एवढ्यात त्या 'MH 02' गाडीचा आवाज आलाय. मी आलो आहे, हे दर्शविणारा हॉर्न वाजतोय. संकेत म्हणून खिडकी उघडी आहे. एकीकडे हिची घालमेळ वाढते आहे. मध्येच गोड बोलून, मध्येच संतापून ती मुलाला बाहेर पाठवण्याच्या प्रयत्नांत आहे. घड्याळाचा काटा पळतोय. तो प्रियकर तरी किती वाट पाहणार? सगळ्या युक्त्या फसून मुलगा चक्क झोपून गेलाय.
गत् आयुष्यातल्या आठवणींनी व्याकूळ होऊन जे तेव्हा नशीबांत नव्हतं ते आता आलंय तरी हे अडथळे येत आहेत. या परिस्थितीला शेवटी हताशपणे शरण जाऊन जोरजोरांत हॉर्न वाजवत चिडून निघून गेलेल्या प्रियकराच्या गाडीचा आवाड ऐकून ती सगळा साजश्रृंगार उतरवून ठेवते आणि घराची खिडकी लावून घ्यायला मुलाला परवानगी देते. रोजचं कंटाळवाणं आयुष्य जगायला तयार होते.
माधवी कुलकर्णी हिने समर्थपणे ही आई उभी केली. उत्तम अभिनय, देहबोली, हालचाली. त्यातही टायमिंग. मुलावर खूप प्रेम असूनही या श्रृंगाराच्या ओढीने चिडलेली अगदी दुष्ट वाटावी अशी आई तिने समर्थपणे उभी केली. सर्वात कौतुक कुमारवयीन मुलगा शशांक याचा. त्याचा बालसुलभपणा, वावरण्यातला सहजपणा, निरागसता. आईला त्रास देताना पण मजा करणारा. हट्टाने घरातून बाहेर जायला नकार देणारा मिस्कील मुलगा खरे नाव शशांक इंगळे असणा-या या मुलाने समर्थपणे उभा केला. या वयात त्याला आईचे हे अधीर होणे, थोडे नटणे, सतत बाहेर जा म्हणून मागे लागणे, त्याला उमजत होते का? त्याच्या कुठल्याही वागण्यात आईबद्दल आकस नव्हता, पण काहीतरी वेगळं घडतंय याची जाणीव होती. पृथ्वीच्या इंटिमेट थिएटरमध्ये दिग्दर्शक विश्वास सोहोनी यांनी प्रयोग अतिशय देखणा बसवला आहे. कथेटचे नाट्यरुपांतरी खूप प्रयोगक्षम करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
सुरुवातच लताबाईंच्या एका जुन्या गाण्याने होते आणि माहोल बदलतो. पूरक पार्श्वसंगीत अनुभव गडद करतो. अविष्कारच्या टोपीत आणखी एक मानाचा पिस !
(लेखिका या रंगभूमी कलाकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. याशिवाय शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथील त्या निवृत्त प्राध्यापिक आहेत.)