आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश मांजरेकर घेऊन येत आहेत ‘शिवाजी पार्क मुंबई २८’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दशकानु दशकं रसिकांची सेवा करणारे हे कलाकार आपापल्या परीने चित्रपटसृष्टी सशक्त बनवण्याचं काम करीत आहेत, पण या सर्वांना एकत्र आणून एखादी संवेदनशील कलाकृती तयार करण्याची किमया अद्याप कोणीही केलेली नाही. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या आगामी चित्रपटात ही किमया साधली आहे.
 
केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय असलेले दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंतसुद्धा या चित्रपटात आहेत. त्यामुळे ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ हा चित्रपट म्हणजे जणू मराठीतील दिग्ग्ज कलाकारांना एकाच वेळी चंदेरी पडद्यावर पाहण्याची पर्वणीच ठरणार आहे. या जोडीला संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस हे आजच्या पिढीतील तरुण कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. 
 
महेश वामन मांजरेकर प्रस्तुत व गौरी पिक्चर्स निर्मित ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन करीत असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाचे  दिग्दर्शन करीत आहेत. ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे.
 
अभिराम भडकमकर यांनी ‘शिवाजी पार्क मुंबई २८’चं लेखन केलं असून, छायांकन करण रावत करीत आहेत. शीर्षकापासूनच नावीन्य जपणाऱ्या ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटात नेमकं काय दडलंय ते अद्याप गुलदस्त्यातच असलं तरी एकंदरीतच सशक्त लिखाण, कुशल दिग्दर्शन तसंच चित्रपटातल्या कलाकारांच्या दमदार फळीमुळे ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
बातम्या आणखी आहेत...