आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे हा हॅण्डसम अॅक्टर, पहिल्यांदाच बघा बालपणीचे Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होणार सून मी ह्या घरची' या झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर  आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शशांकचा जन्म 15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला.   
 
इंजिनीअर आहे शशांक... 
शशांकने ठाण्यातील व्हीपीएम पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केला. त्यानंतर पुण्यातील के. डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मुळात इंजिनिअर असलेल्या श्रीने ऑस्ट्रेलियातून मास्टर्स डिग्री मिळवली. याशिवाय तो एक राष्ट्रीय स्तरावरील स्विमरसुद्धा आहे. फोटोग्राफी, भटकंती हे शशांकचे आवडते छंद असून तो शाकाहारी आहे.
 
'पूर्णविराम' नाटकाद्वारे अभिनयाला सुरुवात...  
शशांकने 'पूर्णविराम' या मराठी नाटकाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'कालाय तस्मैः नमः' ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन, या मालिकांमध्ये त्याने छोटेखानी भूमिका साकारल्या. 'रंग माझा वेगळा' ही शशांकची मुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका होती. मात्र शशांकला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे. या मालिकेत शशांकने श्रीरंग नावाच्या उद्योजकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो 'इथेच टाका तंबू' या मालिकेत झळकला.
 
मोठ्या पडद्यावर झाली शशांकची एन्ट्री... 
शशांकचे मोठ्या पडद्यावरही पदार्पण झाले आहे. 'वन वे तिकिट' हे त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव. यात तो अमृता खानविलकरसोबत झळकला होता. आता लवकरच तो  'भगवद गीता' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ज्यात त्याच्याबरोबर आहे सायली संजीव. काही दिवसांपूर्वीच शशांकने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते.त्यात चेहरा नसलेल्या स्त्री-पुरुषाची चित्र आहेत. तसंच एकतर्फी प्रेम, पनवती, फोन-प्रेम, फसवण, आठवण सारखे शब्द लिहिलेले दिसताहेत व मध्यभागी कुरियर व्हॅनचं रेखाटन दिसतंय. चित्रपट कदाचित सस्पेन्स थ्रिलर असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. 'भगवद गीता'ची निर्मिती भरत जे जोशी यांनी केली असून आणि कथा आणि दिग्दर्शन आहे अंकुर काकतकर यांचं. पटकथा लिहिलेय मानस लायल यांनी तर छायांकन गौरव पोंक्षे यांनी केलंय. 

व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण... 
शशांकने नुकताच व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा प्रवेश केलाय. 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकात शशांक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. दोन पिढ्यांमधील अंतर हा या नाटकाचा विषय आहे. 
 
आज शशांकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याचे बालपणीचे खास फोटोज दाखवत आहोत. या फोटोजमध्ये तुम्हाला मागील काही वर्षांत शशांकच्या लूक्समध्ये झालेला बदल बघता येईल. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, शशांकचे बालपणीपासूनचे आतापर्यंतचे खास Photos...  
 
(नोट - सर्व छायाचित्रे शशांकच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)

 
बातम्या आणखी आहेत...