Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Actress Spruha Joshi Shares Gudipadwa Memories

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : चैत्रचाहूल कार्यक्रमाच्या आठवणी मनात रुंजी घालतात

समीर परांजपे | Mar 23, 2017, 00:27 AM IST

  • सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : चैत्रचाहूल कार्यक्रमाच्या आठवणी मनात रुंजी घालतात
येत्या 28 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण आहे. हा सण घरांघरांत आनंद-उत्साह घेऊन येतो. विजयाचे प्रतिक असलेली गुढी उभारली जाते, आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांची तोरणे दाराची शोभा वाढवतात. नववर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत पाडव्याचा सण उत्साहात, आनंदात साजरा होतो. याच निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशी या खास दिवसाच्या निमित्ताने सांगतेय 'चैत्रचाहूल' या कार्यक्रमाबद्दलच्या तिच्या आठवणी..
''आमच्या घरात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली गेली आहे असे प्रसंग जवळजवळ नाहीतच. मला वाटते फक्त एकाच वर्षी आमच्या घरी गुढी उभारली गेली होती. त्यामुळे गुढीपाडव्याबद्दल माझ्या काही फारशा आठवणी नाहीत. मात्र दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी होत असलेल्या चैत्रचाहूल या कार्यक्रमाबद्दल माझ्या अनेक आठवणी मात्र नक्कीच आहेत. गेली नऊ-दहा वर्षे चैत्रचाहूल हा कार्यक्रम विनोद पवार व महेंद्र पवार करीत असतात. हा एक साहित्यिक कार्यक्रम असतो. त्याची स्क्रीप्टही दरवर्षी मेहनतीने लिहिली जाते. मी कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असे. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षांपासून मला या कार्यक्रमात सहभागी होणे शक्य होत नाही आहे. तरीही गुढीपाडवा आला की चैत्रचाहूल हा कार्यक्रम मनात रुंजी घालू लागतो.''

स्पृहा पुढे सांगते, "या कार्यक्रमात कमलेश भडकमकर, कौशल इनामदार, जितेंद्र जोशी यासारखे अनेक मान्यवर सहभागी होतात. मला आठवते चैत्रचाहूलच्या कार्यक्रमाची स्क्रीप्ट एका वर्षी कवयित्री अरुणा ढेरे यांनी लिहिली होती. यंदा गुढीपाडव्याला होणारा चैत्रचाहूलचा कार्यक्रमही जरा वेगळा आहे. कवी नलेश पाटील यांना आदरांजली म्हणून यंदा अभिनेते सचिन खेडेकर, कवी सौमित्र हे पाटील यांच्या कविता सादर करणार आहेत. त्याशिवाय ध्यास पुरस्कार, रंगकर्मी पुरस्कारही सन्माननीय व्यक्तींना प्रदान करण्यात येतील. गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या शोभायात्रा निघतात त्यातही मी कधी सहभागी झालेले नाही. त्यामुळे गुढीपाडव्याबद्दल माझ्याकडे सांगण्यासारखे इतकेच आहे."

Next Article

Recommended