आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Noted Marathi And Hindi Actress Baby Shakuntala Aka Umadevi Passes Away On 18th Jan 2014

प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला काळाच्या पडद्याआड, वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला )

कोल्हापूरः प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी खंडेराव नाडगौडा यांचे रविवारी कोल्हापुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
17 नोव्हेंबर 1932 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे माहेरचे नाव शकुंतला महाजन. त्यांचे शिक्षण पुण्याच्या भावे प्रशालेत झाले. वयाच्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या बेबी शकुंतला यांचा पहिला सिनेमा 'प्रभात' कंपनीचा 'दहा वाजता' हा होता. त्यानंतर शांताराम बापू यांनी बेबी शकुंतला यांना 'रामशास्त्री' सिनेमात भूमिका दिली. या सिनेमात त्यांच्यावर चित्रीत झालेली गाणी बरीच गाजली.
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी अभिनयाची छाप सोडली. हिंदीमध्ये त्यांनी सुमारे 40 सिनेमांत काम केले. मायाबाजार, मी दारू सोडली, सौभाग्य, अबोली, अखेर जमलं, चिमणी पाखरं, माय बहिणी, कमल के फूल, सपना, झमेला या सिनेमांसह किशोर कुमार यांची नायिका म्हणून फरेब, लहरे या सिनेमात त्यांनी काम केले.
यशोशिखरावर असतानाच त्यांनी 1954मध्ये खंडेराव नाडगौडा यांच्यासोबत लग्न केले आणि सिनेमातून निवृत्ती स्वीकारली. बारा वर्षांच्या कालावधीत त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील साठ सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांना प्रभात पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कोल्हापूर भूषण शाहू मोडक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
बेबी शकुंतला यांच्या निधनाचे वृत्त कळताच येथील हिंदी व मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.