आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतोष राम दिग्दर्शित 'चायना मोबाईल' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : ‘वर्तुळ’ आणि ‘गल्ली’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी आपल्या टीमसह पहिला चित्रपट "चायना मोबाईल" ची निर्मिती व दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निवडक कलाकारांसह चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
"चायना मोबाईल" या चित्रपटाद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या जीवनविश्वाचे दर्शन, तसेच आजच्या मराठवाड्यातील जीवनवास्तव पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आहे, असे निर्माते - युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी सांगितले. संतोष राम यांचा फिचर फिल्म प्रकारातील "चायना मोबाईल" हा पहिलाच चित्रपट असून यापूर्वी "वर्तुळ" हा त्यांचा लघुपट 54 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये निवडण्यात आला आणि 14 पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे. संतोष राम यांची निर्मिती दिग्दर्शन असलेला "गल्ली" हा लघुपट आता अनेक चित्रपट महोत्सवातून आपल्या समोर येत आहे.
“चित्रपटाची पटकथा ही प्रेम, राजकारण आणि मैत्री या मानवी भाव-भावनांभोवती विणलेली आहे, तरी हा चित्रपट जागतिक जीवनमूल्यांचा आत्मा असलेला विषय सर्वांसमोर घेऊन येत आहे,”असेही ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्रपटाचे शुटींग 20 जानेवारीपासून सुरु होत असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये "चायना मोबाईल" घेऊन जाण्याचा संतोष राम यांचा मानस आहे.
संतोष राम यांनी इंग्रजी साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण मॉडर्न कॉलेज, पुणे येथे घेतले आहे. महानगरीय जीवनांतील विविध पैलूंचा व सिनेमाचा अभ्यास त्यांनी मैक्सम्युलर भवन, मुंबई येथे केला. फिल्म एंड टेलिव्हिजन इंस्टीट्युट, पुणे येथे त्यांनी चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तेनाई इको फिल्म फेस्टिवल, गोवा या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवाच्या क्रिएटीव्ह बोर्डाचे सल्लागार आहेत आणि त्रिचूर येथे होणाऱ्या 11व्या व्हीबग्योर लघुपट महोत्सवासाठी ते महाराष्ट्र प्रदेशचे निवड समिती सदस्य आहेत.