आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Court Official Entry From India For Oscar

मराठमोळ्या \'कोर्ट\'ने चढली ऑस्करची पायरी, भारतातर्फे अधिकृत प्रवेशिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतंरराष्ट्रीय पातळीवर मानाचा समजल्या जाणा-या ऑस्कर पुरस्कारासाठी 'कोर्ट' या मराठी सिनेमाची निवड झाली असून हा सिनेमा भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवण्यात आली आहे. विविध भाषांमधील 30 सिनेमांमधून 'कोर्ट' सिनेमाची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या समितीची निवड केली होती. अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर भारतातून होणा-या ऑस्कर निवड समितीचे ज्यूरी आहेत.
चैतन्य ताम्हणे दिग्दर्शक 'कोर्ट' हा सिनेमा भारतीय कायदेपध्दतीवर आधारित आहे. 'कोर्ट' हा सिनेमा एका लोककलाकाराच्या आयुष्यातील न्यायालयीन लढा वर्णन करणारा आहे. राजकुमार हिराणींच्या 'पीके', नीरज घायवान यांच्या 'मसान', ओमंग कुमारचा 'मेरी कोम', विशाल भारव्दाजचा 'हैदर', दाक्षिणात्य सिनेमा 'काक्का मुट्टी' आणि 'बाहुबली' या सिनेमांमधून राष्ट्रीय पुरस्कार विजेता कोर्ट या मराठी सिनेमाची निवड झाली आहे.
निवड समितीवर असलेले प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुकवर ही माहिती दिली आहे. कोर्टला 2015ला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी सुवर्णकमळ देऊन सन्मानित करण्यात आले होते. 'कोर्ट'ला यापूर्वी 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
'कोर्ट'चे दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे सध्या जापान येथे असून त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना चैतन्य ताम्हाणे म्हणाले, "या प्रवासात आम्हाला कल्पनेपेक्षा अधिक मिळाले आहे. विवेक आणि माझ्यासाठी पुन्हा एकदा मिळालेला हा मोठा आश्चर्याचा धक्का आहे. जेव्हा आम्ही सिनेमावर काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा आमच्या अपेक्षा अगदी थोड्या होत्या. जे घडले ते नक्कीच आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडले आहे. या निर्णयासाठी मी ज्युरींचे आणि सिनेमाला पाठिंबा देणा-या प्रत्येकाचे आभार व्यक्त करतो. "

या सिनेमात लीड रोल साकारणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्या म्हणाल्या, ''जेव्हा माझ्याकडे या सिनेमाची स्क्रिप्ट आली होती तेव्हाच त्यातील वेगळेपण मला जाणवलं होतं. आता ही फिल्म ऑस्करला जातेय त्यामुळे आणखी छान वाटतंय. आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये गेलो, तेथे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. युएसमध्येही हा सिनेमा रिलीज झाला असून न्यूयॉर्क टाइम्सने सिनेमाचा चांगला रिव्ह्यू दिला आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच सिनेमाला होणारेय.''
पुढे वाचा, रवी जाधव यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट...