आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Double Seat Collected Rs 5 Crore At Box Office During 5 Days

‘डबल सीट’ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरूवात, पाच दिवसांत पाच कोटींची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

“स्वप्नं बघणा-या आणि जगणा-या माणसांची गोष्ट” असलेल्या ‘डबल सीट’ चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांत पाच कोटींची कमाई करत दणक्यात सुरूवात केली आहे. क्षितिज पटवर्धन यांची साधी सोपी कथा आणि समीर विद्वांसचे दिग्दर्शन आणि अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेसह विद्य़ाधर जोशी , वदंना गुप्ते या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘डबल सीट’ चित्रपट सध्या महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांची मने जिंकतो आहे.

एस्सेल व्हिजनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘डबल सीट’ चित्रपट गेल्या आठवड्यात राज्यात आणि राज्याबाहेर सुमारे तीनशे चित्रपटगृहांत झळकला. गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांतील महत्वाच्या शहरात सब टायटल्ससह प्रदर्शित झालेल्या ‘डबल सीट’ चित्रपटाला मराठी भाषिक प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
मायानगरी मुंबईतील सामान्य जोडप्याची ही गोष्ट सर्वांनाच भावते आहे, कारण ती त्यांच्या स्वप्नांची गोष्ट आहे. आपल्या रोजच्या जगण्यातील छोट्या स्वप्नांसोबतच आयुष्य बदलवून टाकणा-या एका मोठ्या स्वप्नाची आणि त्यासाठी घ्याव्या लागणा-या मोठ्या ‘उडीची’ ही गोष्ट. चित्रपटातील अमित आणि मंजिरीच्या आयुष्यातील या उडीचा हा समान धागा प्रेक्षकांना चित्रपटाशी जोडून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
‘डबल सीट’ ला मिळालेल्या या यशाबद्दल एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, “एका साध्या कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे सर्व टीमच्या यशाची पावती आहे. मराठीमध्ये भव्य दिव्यतेपेक्षा चांगल्या कथानाकाला प्रेक्षक नेहमी प्राधान्य देतात हे या यशामाधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.” तर दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले की, “या चित्रपटाची कथा ही प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय ठरावी अशीच आहे. त्यामुळेच हा चित्रपट बनवताना तो प्रत्येकाला भिडावा असाच आमचा उद्देश होता. आज ‘डबल सीट’ ला मिळालेलं यश पाहता आम्ही आमच्या उद्देशात यशस्वी झालोय असं वाटतंय आणि याचा मला आणि पूर्ण टीमला खूप आनंद होतोय. प्रत्येक सामान्य माणसामध्ये एक ‘नायक’ दडलेला असतो. अशाच सामान्य स्त्री आणि पुरूषांमध्ये दडलेला ‘नायक’ बाहेर काढणारा आणि त्याच्यातील ‘स्पिरीट’ची जाणीव करून देणारा हा चित्रपट लोकांना आपलासा वाटतोय याबद्दल मनोमन आनंद होतोय.”
या यशाबद्दल चित्रपटाचा मुख्य अभिनेता अंकुश चौधरी म्हणतो की, “एका सकारात्मक विचारातून तयार झालेली कथा आणि तो विचार प्रभावीपणे दिग्दर्शनातून मांडण्यात या चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे. एक चांगली कलाकृती बनली की प्रेक्षक तिला मनापासून प्रतिसाद देतातच. यामुळेच या चित्रपटाला मिळालेल्या यशाचं श्रेय मी लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि प्रेक्षकांना देतो.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, छोट्या पडद्यावरील कोणकोणत्या मालिकांमध्ये अंकुश आणि मुक्ता पोहोचले होते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी...