आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पप्पी दे पारूला'वर केला 'किल्ला'च्या बालकलाकरांनी शूटिंग वेळी धांगडधिंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किल्ला चित्रपटातील बालकार - डावीकडू - गौरीश गावडे, अर्चित देवधर आणि अथर्व उपासनी )

लहानग्यांच्या तरल भावविश्वात घेऊन जाणारा ‘किल्ला’ हा चित्रपट ह्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. यात मुख्य भूमिकेत अर्चित देवधर आहे. तर त्याच्या मित्रांच्या भूमिकेत पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर, अथर्व उपासनी दिसणार आहेत. चित्रपटात काम करताना या सर्व छोट्या मंडळींचा एक कंपूच बनला होता. त्यामुळे ‘किल्ला’चा अनुभव मोठ्या कलाकारांपेक्षा या लहानग्यांनाच जास्त स्मरणात राहणारा ठरला आहे.
अर्चित देवधर याबद्दल सांगतो, ”आम्ही सर्व मुलांनी चित्रपट सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सतत दंगा-मस्ती केली. आजपासून दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सातवीत होतो तेव्हा हा चित्रपट आम्ही चित्रीत केला. चित्रपटासाठी आमची निवड झाल्यावर आमच्यासाठी एक वर्कशॉप घेण्यात आला. तेव्हा आम्हा मुलांची एकमेकांशी गट्टी जमली आणि मग ‘मस्ती की पाठशाला’ ऑन सेट सुरूच असायची. आमचं दिवसभराचं चित्रीकरण संपल्यावर आम्ही आमच्या रूमवर जायचो. तिथे आम्ही मुद्दामहून एकाच रूममध्ये कल्ला करता यावा म्हणून एकत्रच राहायचो आणि रात्रभर दंगा करायचो. आमचं सगळ्यांचं मस्ती करताना आवडतं गाणं होतं, ‘पप्पी दे पारूला’. ते तेव्हा नवीनच आलं होतं. रात्रभर आम्ही मुलं ते गाणं मोबाईलवर लावून आमच्या खोलीत त्यावर नाचायचो आणि मग सकाळी उठायला उशीर व्हायचा. समुद्राकाठीच शुटिंग असल्याने वेळ मिळेल तेव्हा समुद्रावर खेळायला जायचो. मग लपाछपी पासून विषामृत पर्यंत सगळे खेळ खेळायचो. सेटवर असलेल्या मांजरींनाही सोडलं नाही. त्यांनाही त्रास दिला.”
अर्चित देवधर या अगोदर ‘सिद्धांत’ चित्रपटात दिसला होता. पण खरं तर, अर्चितने ‘किल्ला’ पहिला चित्रीत केला होता आणि मग ‘सिद्धांत’ चित्रीत झाला होता. पण चित्रपट रिलीज होताना ‘सिद्धांत’ पहिला झळकला आणि मग आता ‘किल्ला’ रिलीज होतो आहे. या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणाचा अनुभव पूर्णपणे दोन टोकाचा असल्याचे अर्चित सांगतो, ”किल्लाच्यावेळी माझ्या वयाचेच बाकी चौघेजण होते. त्यामुळे ते मित्र झाले आणि शुटिंगच्यावेळी आम्ही मस्तीच करायला एकमेकांना भेटायचो. पण सिद्धांतमध्ये माझ्या वयाचे कोणीच नव्हते. त्यामुळे मस्ती करायला वावच नव्हता. विक्रम गोखले, स्वाती चिटणीस या सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायचंच दडपण अधिक होतं. त्यामुळे सिद्धांत ऐवजी किल्ला चित्रपट जास्त एन्जॉय केला.”
‘किल्ला’नंतर अर्चितने नुकताच ‘सहा गुण’ हा सिनेमाही चित्रीत केला आहे. सध्या अभिनयाची अशी घोडदौड सुरू असताना मात्र अर्चितला अभिनयात करिअर करण्याची सध्यातरी इच्छा नाही. तो मेडिसीनमध्ये आपलं करिअर करू इच्छित आहे. पण याचा विचार गांभीर्याने तो दहावीत करणार आहे. सध्या तरी आपल्या जीवनातला हा मस्त टप्पा तो एन्जॉय करत आहे.
पुढे पाहा, किल्ला चित्रपटातील बालकलाकारांची खास छायाचित्रे...