आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Launch Of Marathi Film Punha Gondhal Punha Mujara

\'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा\'चे म्युझिक लाँच, गाण्यासाठी मराठीत पहिल्यांदाच निऑन कलर्सचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(म्युझिक लाँच करताना सयाजी शिंदे, आशिष विद्यार्थी आणि मकरंद अनासपुरे)

निवडणुकीचे वारे जोरदार वाहतायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत. याच पाश्वभूमीवर नविन सिंग आणि राकेश आर. भोसले निर्मित 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा धमाकेदार मराठी चित्रपट येतोय. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही रुचेल अशा वास्तवदर्शी कथानकावर हा चित्रपट बेतला असून बाळकृष्ण शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. चित्रपटाचा विषय निवडणुक आणि राजकारणावर बेतलेला असल्याने याच्या संगीतात देखील याची खास झलक पहायला मिळणार आहे.
पंकज छ्ल्लानी प्रस्तुत 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा राजकीय व्यंगपट येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय; तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि आशिष विद्यार्थी यांच्या हस्ते 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा'ची गीत ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली असून यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' चित्रपटात दोन गीते असून दोन्ही गीते श्रवणीय आणि रंगतदार झाली आहेत. यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'आता होऊ दया खर्च' ही रेश्मा सोनावणे त्यांच्या आवाजातील ठसकेदार लावणी गीत प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या गीताचे शब्द अरविंद जगताप यांचे असून शशांक पोवार यांनी या गाण्याला अप्रतिम संगीत दिलं आहे. मराठीत प्रथमच निऑन कलर्सचा वापर करून या गीताचे सादरीकरण करण्यात आले असून प्रेक्षकांना ते पडद्यावर पाहताना त्यातील वेगळेपण जाणवेल. या सोबत 'नटरंगी नार' हे उर्मिला धनगर यांच्या आवाजातील गीत देखील प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार आहे.
'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' चित्रपटात प्रेक्षकांना नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे यांच्या पारंपारिक शत्रुत्वाची कथा अधिक मनोरंजकतेने पहायला मिळणार आहे.

मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या लक्षवेधी भूमिका असलेल्या या चित्रपटात हिंदी ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ आणि आशिष विद्यार्थी देखील विशेष भूमिकेत दिसणार आहे.