श्रावण सुरू झाला की मराठमोळया सणांची चाहूल लागते आणि गणेशोत्सवाचे वेध लागतात. मराठी चित्रपटसृष्टीही आपापल्या परीने गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होते. विविध मराठी चित्रपटांमधील गणेशभक्तीपर गीते रसिकांचे लक्ष वेधून घेतात अन् गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होते. त्यामुलेच दरवर्षा चित्रपट रसिकही नवनवीन गणेश गीतांची आतुरतेने वाट पाहात असतात. ‘यारी दोस्ती’च्या प्रचंड यशानंतर पेशनवल्ड एंटरटेनमेंट आणि जय श्री माधव क्रिएशन्स या निर्मिती संस्था ‘यारी दोस्ती 2’ या शीर्षकाने या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहेत.
‘यारी दोस्ती’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लेखक-दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी केलं होतं. या चित्रपटाला केवळ चित्रपटगृहांमध्येच नव्हे तर सोशल मीडियावरही चांगलं यश मिळलं. यू टयुबवर हा चित्रपट केवळ 4 महिन्यात 30 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी पाहिल्याची नोंद झाली आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेता शांतनू अनंत तांबे आणि निर्मात्या सारिका विनोद तांबे व सुमन माधव अवस्थी ‘यारी दोस्ती 2’ बनविण्यासाठी सज्ज झाले आहेत. गीत ध्वनी मुद्रणाद्वारे ‘यारी दोस्ती 2’ चा शुभारंभ करण्यात आला आहे. अंधेरीतील वॉव एन्ड फ्ल्युटर रेकॉर्डिंग स्टुडिओत नुकतेच ‘यारी दोस्ती 2’ मधील “माझा गणराय...’’ या गणेशभक्तीपर गीताचं ध्वनीमुद्रण करण्यात आलं.
“माझा गणराय...’’ असे बोल असलेलं हे गीत मिलिंद साळवे यांनी लिहिलं असून सचिन-दिपेश यासंगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं आहे. प्रवीण कुंवर आणि सुहास सावंत यांच्या आवाजात हे गीत ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. रूपक ठाकूर या गाण्याचे साऊंड रेकॉर्डिस्ट असून उदय साळवी यांनी हे गाणं एरेंज केलं आहे. ‘यारी दोस्ती 2’ मधील हे गीत प्रसंगानुरूप असून गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित करणारं असल्याचं मतशांतनू अनंत तांबे यांनी व्यक्त केलं आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागात तांबे यांनी चार जिवलग मित्रांची अनोखी कथा सादर केली होती. ‘यारी दोस्ती 2’ मध्येही प्रेक्षकांना मैत्रीवर आधारित असलेली कथा पाहायला मिळणार असल्याचं ते सांगतात. मैत्री हे जगातील सर्वात अनोखं आणि अद्भुत नातं असून ते नेहमीच वेगवेगळया रूपात समोर येत असतं. त्यामुळेच त्यातील नावीन्य कधीच कमी होत नाही. ‘यारी दोस्ती 2’ मध्येही आपण मैत्रीचे नवीन कंगोरे सादर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तांबे म्हणाले.