आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दशक्रिया' या नावातच आव्हान आहे, सांगताय निर्मात्या कल्पना विलास कोठारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगळ्या जातकुळीच्या विषयाला हात घालून त्या विषयावर चित्रपट निर्मितीच शिवधनुष्य उचलणं हे मराठी चित्रपट निर्मातात्यांसाठी सध्या खूप मोठ्ठ आव्हान आहे. त्यातही 'दशक्रिया' सारखा अत्यंत संवेदनशील विषय म्हणजे निर्मात्याची एक प्रकारे परीक्षाच म्हणता येईल, पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन 'दशक्रिया' चित्रपट निर्मितीचं आव्हान स्वीकारून निर्मात्या सौ. कल्पना विलास कोठारी यांनी पदार्पणातच बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये विविध गौरव आणि ३ राष्ट्रीय पुरस्कार पटकावून मराठीचा झेंडा पुन्हा अटकेपार फडकवत ठेवला आहे. त्यांच्या 'रंगनील क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेचा 'दशक्रिया' हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  या निमित्तानं कल्पना कोठारी यांच्याशी साधलेला संवाद... 
 
सहसा आशयघन चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते तयार होत नाहीत. तुम्ही तसं न करता 'दशक्रिया'सारख्या आशयघन विषयावर चित्रपट निर्मितीसाठी कशा तयार झालात?
- काही वर्षांपूर्वी मी प्रेमानंद गज्वी यांच्या किरवंत या नाटकात काम केलं होतं. या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत बरीच पारितोषिकं मिळाली होती. तेव्हाच हा विषय आवडला होता. व्यावसायिक रंगभूमीवर काही चांगल्या नाटकांची निर्मिती केली होती. त्या दरम्यानच लेखक संजय कृष्णाजी पाटील आणि दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी दशक्रिया या चित्रपटाचा प्रस्ताव मांडला. संहिता वाचल्यावर विषय आवडला. लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनी चित्रपटाचं लेखन उत्तम केलं होतं. दशक्रिया ही बाबा भांड यांची राज्य पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. चित्रपटासाठी केवळ चांगला विषय असून भागत नाही, तर चित्रपट किती चांगला बनतो, हेही महत्त्वाचं असतं. संदीप पाटील यांचा आत्मविश्वास पाहून हा चित्रपट करायचं ठरवलं. संजय कृष्णाजी पाटील आणि संदीप पाटील, राम कोंडीलकर यांनी अनुभवी कलाकारांची निवड केली. त्यामुळे एक आत्मविश्वास आला, आपण चांगली निर्मिती केली, तर ती प्रेक्षक स्वीकारतात, असा अनुभव आहे.  
 
संदीप पाटील यांच्यासारख्या नव्या दिग्दर्शकाकडे चित्रपटाचं दिग्दर्शन सोपवताना दडपण नाही आलं?
- संदीप पाटील यांनी या पूर्वी सहायक दिग्दर्शक म्हणून अनेक चांगल्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांचा या माध्यमाचा अनुभव दांडगा आहे. या विषयाला ते योग्य न्याय देतील अशी चमक त्यांच्यात दिसत होती. त्यांनी या विषयाचा केलेला सखोल विचारच साक्ष देत होता. शिवाय संहिता उत्कृष्ठ होती. त्यामुळे तसं काही दडपण नव्हतं. 
 
दशक्रिया हा चित्रपट करायचं ठरल्यावर कुटुंबाचा कसा प्रतिसाद होता?
- दशक्रिया हा चित्रपट करायचं ठरवल्यावर कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा होता. माझे पती, मुलगा नील, मुलगी मनाली, जावई सागर रायसोनी हे सर्वजण या निर्मिती प्रक्रियेत उत्साहानं सहभागी झाले. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं सहकार्य होतं. त्यांनी माझ्यावर आणि चित्रपटाच्या संहितेवर विश्वास दाखवला. तसंच संजय कृष्णाजी पाटील, संदीप पाटील, राम कोंडीलकर या सर्वांनी फारच छान काम केलं.
 
तुम्ही या चित्रपटात छोटी भूमिकाही केली आहे. त्याविषयी काय सांगाल? चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?
- आधी म्हटल्याप्रमाणे, मी नाटकाशी पूर्वीपासून संबंधित होते. नाटकांतून अभिनयही केला होता. मात्र, नाटक वेगळं आणि चित्रपट वेगळा. या चित्रपटात माझी भूमिका अगदीच छोटी आहे. मात्र, मला काम करायला खरंच खूप मजा आली. चित्रपट हे किती सशक्त आणि वेगळं माध्यम आहे हे अनुभवता आलं. केवळ मीच नाही, तर आमच्या टीममध्ये प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. भूमिका छोटी असो वा मोठी, सर्वांनीच अगदी समरस होऊन काम केलं. 
 
राम कोंडीलकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. त्याबद्दल काय वाटतं?
- राम कोंडीलकर पहिल्यापासूनच चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग होते. त्यांना या क्षेत्राची पूर्ण माहिती आहे. बराच अनुभव आहे. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे त्यांच्याकडे निर्मितीची जबाबदारी सोपवली. त्यांनीही अगदी घरातल्यासारखंच काम केलं. एका चित्रीकरणावेळी खूप पाऊस पडला. आठ दिवसांचं शेड्यूल रद्द करावं लागलं. अशा परिस्थितात न डगमगता त्यांनी आणि संदीप पाटील यांनी काम केलं. सर्वांना सांभाळून घेतलं. 
 
पदार्पणातच 'दशक्रिया'ला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एवढं यश मिळेल याची अपेक्षा होती?
- खरं सांगायचं, तर खरंच एवढी अपेक्षा नव्हती केली. आम्हाला फक्त चांगला चित्रपट करायचा होता. त्याला ३ राष्ट्रीय चित्रपटांसह एकूण २८ पुरस्कार मिळाले आहेत. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बाबा भांडं यांची मूळ कादंबरी आणि संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेली संहिता भक्कम होती त्यामुळे एक उत्तम आणि दर्जेदार चित्रपट तयार होईल, हा विश्वास होता. तसा तो झाला.
 
पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर पुन्हा चित्रपट निर्मिती करणार का? 
- हो, नक्कीच करणार. दशक्रियाला पुरस्कारांसह प्रेक्षकांचंही प्रेम लाभेल, याची खात्री आहे. नवा चित्रपट नेमका कोणत्या धाटणीचा असावा, याचा काही विचार केलेला नाही. आमच्यासाठी चित्रपटाचा विषय, चांगली संहिता असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चांगली संहिता मिळाली, तर नक्कीच पुन्हा नवी चित्रपट निर्मिती करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...