आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रमोशनल फंडा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’च्या प्रसिद्धीला कार्टून्सची हजेरी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ख्वाडा' चित्रपटाचे पोस्टर आणि त्यावर तयार करण्यात आलेले कार्टुन्स. - Divya Marathi
'ख्वाडा' चित्रपटाचे पोस्टर आणि त्यावर तयार करण्यात आलेले कार्टुन्स.

भन्नाट कल्पना काढून येत्या 22 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘ख्वाडा’ची अफलातून प्रसिद्धी सुरु असून, त्यापैकीच एक असलेली ‘ख्वाडा बघायचा राहिलाच की! पण तुम्ही बघायला विसरू नका!’ ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाची कार्टून पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरताना दिसत आहे.
‘विसर्जनाला चाललेला गणपती बाप्पा म्हणतो, की मी तर चाललो, पण ‘ख्वाडा’ बघायचा राहिलाच की! पण तुम्ही बघायला विसरू नका.’ प्रसिद्ध व्यंगचित्रकार उदय मोहिते यांनी काढलेले हे व्यंगचित्र फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर ‘व्हॉट्सप’वर अनेक ग्रुपवर फिरू लागले आहे.
‘ख्वाडा’च्या भन्नाट आयडियांच्या, विविधरंगी कल्पना सध्या पहायला मिळत असून, अभिनव पद्धतीने जोरदार प्रसिद्धी सुरु आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी ‘लालबाग राजाच्याचरणी अर्पण करून, चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पोस्टर प्रसिद्ध डिझायनर किरण चांदोरकर यांनी साकारले आहे. त्यानंतर अहमदनगर आणि बार्शी भागात बैल पोळ्याला बैलांच्या पाठीवर ‘ख्वाडा’ रंगवून काढलेली मिरवणूक चांगलीच गाजली. ‘ख्वाडा’चा टिजर आणि गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोलापूरच्या भागात हे गाणे गणेशोत्सवात खूपच गाजले. आता कार्टून फिरताना दिसत आहे. ख्वाडा चित्रपटासाठी एकाचवेळी अशा अनेक भन्नाट चमकदार कल्पना वापरल्या जात आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी व्यंगचित्र काढणारे, आघाडीचे व्यंगचित्रकार मोहिते यांनी, यांपुर्वी ‘बालक-पालक’ आणि ‘टाईमपास २’ या चित्रपटांसाठी व्यंगचित्रं काढली होती. ते म्हणाले, “गणेशोत्सव, नवरात्र आणि सामाजिक गोष्टींचा संदर्भ घेऊन ‘ख्वाडा’साठी व्यंगचित्रं काढली जाणार आहेत. फेसबुकवर फोटो पेक्षा चित्रांना आणि व्यंगचित्रांना अधिक पसंती मिळते, हे लक्षात घेऊन ‘ख्वाडा’साठी व्यंगचित्रांची रचना करण्यात आली असून, यापुढे वेगवेगळी व्यंगचित्रं पाहायला मिळतील.”
चित्रपटाचे प्रेझेंटर चंद्रशेखर मोरे हे स्वतः गाजलेले कला दिग्दर्शक असून, त्यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘ख्वाडा’च्या प्रसिद्धीमध्ये वेगवेगळ्या कलांचा संगम दिसतो आहे. मोरे म्हणाले, “’ख्वाडा’च्या निमित्ताने सगळे सर्जनशील कलाकार एकत्र आले असून, अनेकविध कलांचा उत्कृष्ट वापर करण्यात येत आहे. ज्या सर्जनशीलतेतून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, तितक्याच कलात्मकतेने प्रसिद्धी सुरु आहे.”

‘ख्वाडा’ चित्रपटाला 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साऊंड’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे 5 राज्य पुरस्कार मिळाले आहेत. 2015 च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. यांशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात 2015’ चार पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, महाराष्ट्राचा नवा नादखुळा रांगडा मर्द गडी अर्थात भाऊसाहेब शिंदे आणि तगडा खलनायक साकारणारे अनिल नगरकर या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. याशिवाय रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, योगेश डिंबळे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे, अमोल थोरात, नाना मोरे, हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'ख्वाडा'च्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या कार्टुन्सची झलक...