प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान ह्यांची मुख्य भुमिका असलेल्या ‘कार्टी काळजात घुसली’ ह्या नाटकाने नुकताच १०० प्रयोगांचा महत्वाचा टप्पा पूर्ण केला. त्यानिमीत्ताने ‘प्रशांत दामले फॅन फाउन्डेशन’ने नुकतंच नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाला जोरदार सेलिब्रेशन केलं. नाटकातल्या बाप-लेकीच्या यशाच्या ह्या सेलिब्रेशनचं वैशिष्ठ्य होतं, हे नाटक पाहण्यासाठी शंभराव्या प्रयोगाला आलेली पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकर ही बाप-लेकीची जोडी.
शंभराव्या प्रयोगाच्या सेलिब्रेशनच्यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी प्रशांत दामलेंना यंदाचा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वांसमक्ष जाहिर केला, तेव्हा हा तर प्रशांत दामले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुग्धशर्करा योगच होता.
मंगेशकर कुटुंबियांकडून मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा प्रदीर्घ नाट्यसेवेसाठीचा पुरस्कार नाट्यसृष्टीत अत्यंत मानाचा मानला जातो. प्रशांत दामले ह्यांनी तब्बल तेहतीस वर्ष रंगभूमी गाजवलेली आहे. ह्या विनोदाच्या बादशहाला हा पुरस्कार जाहिर केल्यावर पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी मराठी रंगभूमीची गेली तीन दशके अविरत सेवा केली आहे. हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय कमी असल्याचा एक मुद्दा उपस्थित झाला, पण कमी वयातही त्यांनी केलेली कामगिरी अत्योच्च आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी त्यांचीच निवड योग्य असल्याचे निवड समितीने ठरविले.”
हा पुरस्कार जाहिर झाल्यावर भारावून गेलेले प्रशांत दामले, नाटकाबद्दल आणि पुरस्काराबद्दल म्हणाले, “मी माझ्या रंगभूमीवरील ३३ वर्षांच्या कारकिर्दीत ११ हजार नाट्यप्रयोगांचा टप्पा पार करेन असे कधी वाटलेच नव्हते. पण हे नाट्यरसिकांचं भरभरून प्रेम आहे, जे मला इथंवर घेऊन आलंय. वसंत सबनीस ह्यांनी लिहीलेलं हे ‘कार्टी काळजात घुसली’ नाटक ह्याअगोदरही दोनदा दोन वेगवेगळ्या बाप-लेकीच्या जोडीसोबत रंगभूमीवर आलं होतं. कालिदास कान्हेरेंची भुमिका पहिल्यांदा सुधीर जोशी नंतर मोहन जोशी ह्यांनी केली होती. त्यामूळे माझ्यावर एक जबाबदारी होती. पण आता शंभर प्रयोगांनंतर ही जबाबदारी पेलण्यात मी यशस्वी झालो, हे तुमच्या उदंड प्रतिसादामूळे मला कळलंय. शंभर प्रयोग पूर्ण करताना दिनानाथ मंगेशकर पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार जाहिर होणं, हे माझं भाग्यच आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ‘कार्टी’ तेजश्री प्रधान काय म्हणतेय नाटकाबद्दल