आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebration Time: अशोक सराफ ह्यांच्या ‘लगीनघाई’ नाटकाचे झाले ७५ प्रयोग पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुयोग निर्मित, निर्माते गोपाल अलगेरी यांच्या ‘लगीनघाई’ ह्या विनोदी नाटकाने आपला अमृतमहोत्सवी प्रयोग नुकताच रंगभूमीवर सादर केला. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री आदिती देशपांडे ह्यांच्या नाटकात मुख्य भूमिका आहेत. ७५ प्रयोगानिमीत्ताने मुंबईच्या दिनानाथ मंदिर नाट्यगृहात केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले.
नाटकाला ७५ प्रयोग पूर्ण होण्याच्या निमीत्ताने, वर्षा उसगांवकर, रमेश भाटकर, मृदूला भाटकर, स्वाती चिटणीस, मकरंद देशपांडे, चिन्मयी सुमीत, विजय केंकरे, तुषार दळवी, प्रथमेश परब नाटक पाहायला आले होते.
नाटकाला ७५ प्रयोग पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने divyamarathi.comशी बोलताना अभिनेते अशोक सराफ म्हणाले, “माझ्या प्रत्येक नाटकाने १०० किवा ५०० प्रयोगांचा टप्पा पूर्ण केलेला आहेच. आणि ह्या नाटकाचे ७५ प्रयोग आता झालेत. पण ५०० प्रयोग पूर्ण होणे काही अवघड नाही. अव्दैतने नाटक खूप सुंदरपणे लिहीलंय. नाटक चालण्यासाठी त्यांची बांधणी उत्तम हवी. आणि ती ह्या नाटकाच्या संहितेचे एक मुख्य वैशिष्ठ्य आहे. त्यामुळेच हे नाटक आज प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय. गेल्या ७५ प्रयोगांमध्ये वेगवेगळ्या त-हेचे प्रेक्षक भेटले. काहीजण माझी ह्या अगोदरची नाटके पाहत आलेले आहेत. तर एक पिढी अशीही भेटते, जे मला सिल्व्हर स्क्रिनवर पाहत, लहानाचे मोठे झाले. आणि पहिल्यांदा माझे नाटक पाहतायत.आणि रंगभूमीवरचा मी त्यांना पहिल्यांदाच दिसतो. माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करणा-या मित्रमंडळींमधले सचिन-सुप्रिया हे माझे खास मित्र आहेत. दोघेही माझे प्रत्येक नाटक आले की, पाहायला येतातच.”
अभिनेत्री अदिती देशपाडे नाटकाच्या अमृतमहोत्सवी प्रयोगाबद्दल सांगते, “मामांसोबत नाटक करण्याची मजा काही औरच आहे. एक तर ते अनेकांचे आयडल आहेत. त्यांची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, नाटक करताना नेहमीच ह्या गोष्टीचा अनुभव आलाय. मी नेहमीच प्रायोगिक रंगभूमीशी निगडीत राहिलीय. अनेक वर्षांनी व्यवसायिक नाटक करतेय. त्यामुळे अनेक लोकांनी ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ नंतर मला ह्या नाटकामूळे पाहिलंय. त्यांच्या खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया गेल्या ७५ प्रयोगांमध्ये आल्यात. एकूणच हा अनुभव खूप छान आहे.”
या दोन अंकी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे असून संगीत अभिजीत पेंढारकर, नेपथ्य शशांक तरे, प्रकाश शीतल तळपदे, वेशभूषा प्रणोती जोशी यांची आहे. यात आदिती देशपांडे, आणि अशोक सराफ यांच्यासोबतच नियती घाटे आणि ओंकार राऊत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नाटकाच्या सेलिब्रेशनचे फोटो