एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. ही घराघरांत प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने नुकतंच यशस्वी एक वर्ष पूर्ण केलंय. गेल्यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. कोल्हापूरचा एक रांगडा पैलवान राणा आणि त्याची पत्नी अंजलीबाईच्या अवतीभोवती या मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. मालिकेला यशस्वी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेटवर केक कापून कलाकारांनी हा आनंद साजरा केला आहे.
या मालिकेत राणाच्या भूमिकेत हार्दिक जोशी तर अंजलीच्या रुपात अक्षया देवधर ही नवोदित जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. या मालिकेची कथा, पटकथा सुबोध खानोलकर यांची तर संवाद तेजेश घाडगे यांचे आहेत. स्मृती सुशिलकुमार शिंदे यांच्या सोबो फिल्म्स प्रा. लि. या संस्थेने मालिकेची निर्मिती केली असून निरंजन पत्की हे मालिकेचे दिग्दर्शक आहेत. कोल्हापूर नजीकच्या एका छोट्या गावात या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे.
या मालिकेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, मालिकेतील कलाकारांचे पडद्यामागेच खास क्षण... शूटिंगच्या फावल्या वेळेत कलाकारांची धमाल-मस्ती खास फोटोजमधून बघता येणार आहे.
चला तर मग पाहुयात, पडद्यामागे कशी धमाल करतात राणा-अंजलीसह मालिकेतील इतर कलाकार...