(छायाचित्रः अभिनेता चिन्मय उदगीरकर)
सन 2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
याच सदरात आज अभिनेता चिन्मय उदगीरकरहे वर्ष कोणत्या घटनेमुळे त्याच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
"नमस्कार मित्रांनो, 2014 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. लवकरच
आपण नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत. यावर्षी जरा मागे वळून पाहिले असता ब-याच गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. गेली चार वर्षे मी 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत काम करत होतो, या मालिकेने यावर्षी 10 जूनला प्रेक्षकांचा निरोप घेतला. या चार वर्षांत आपण काय कमावले आणि काय गमावले, याचा आढावा मी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून घेतोय. आता मालिका थांबवून सिनेमांकडे आपला मोर्चा वळवण्याचा महत्त्वाचा निर्णय मी यावर्षी घेतला आहे. सध्या मी चित्रनगरी कोल्हापुरात माझ्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अद्याप माझ्या या नवीन सिनेमाचे शीर्षक ठरायचे आहे. यामध्ये अभिनेत्री गिरीजा जोशी माझ्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही दादा कोंडके यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. एकंदरीतच 2014 हे वर्ष माझ्यासाठी नॉस्टेल्जिक आणि पुढचं पाऊल टाकणारे ठरले आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मराठी इंडस्ट्रीत चॉकलेट हीरोची इमेज असलेल्या चिन्मयची खास छायाचित्रे...
(शब्दांकनः वैशाली करोले)