आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : आरती - असीम त्यागाच्या लोकविलक्षण गोष्टीची सरधोपट मांडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट आरती
रेटिंग २.५ स्टार
कलावंत अंकिता भोईर, रोशन विचारे, उमेश दामले, आसावरी असूडकर, सपना कारंडे, प्रियांका करंदीकर,सुप्रित कदम, तृप्ती गायकवाड, आशुतोष दीक्षित, आर जे रिया, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे, राधिका देशपांडे, विनोद सिंग.
पाहुण्या कलाकार - वहिदा रेहमान
निर्माती /दिग्दर्शक /कथा  सारिका मेणे
संवाद प्रभाकर भोसले
संगीत प्रशांत सातोसे व सुजित -तेजस
श्रेणी फॅमिली ड्रामा
 
 
वास्तववादी घटनांवर आधारित चित्रपट बघताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखांमध्ये कुठेही काल्पनिक रंग मिसळलेला असला किंवा अवास्तव वाटणारे पदर त्या भूमिकेला असले तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. वास्तववादी घटनांवर आधारित असा दावा करत बनविलेले जाणारे काही चित्रपट इतके भीषण असतात की ते िचत्रपट पाहाणेही अंगावर काटा आणणारे असते. अशा बऱ्याच चित्रपटांची उदाहरणे देता येतील. पण त्या विषयात न जाता आरती या चित्रपटाबद्दल जाणून घेऊ. आरती या मुलीला झालेल्या अपघातानंतर ती मानसिक व शारिरिकदृष्ट्या संपूर्ण विकल झाली. ती संपूर्णपणे परावलंबी झाली. तिला तिच्या अस्तित्वाची फार जाणीवही राहिली नव्हती. असा स्थितीत तिच्या प्रियकराने तिची जीवापाड काळजी घेतली. एक दोन दिवस नव्हे तर काही महिने. तिच्या शुश्रुषेत तो रात्रंदिवस मग्न झालेला होता. त्याचे सारे जग आता आरतीची देखभाल हेच झाले होते. आजच्या काळात जिथे सख्खा भाऊ आपल्या भावाला विचारत नाही, तिथे  केवळ प्रेमाच्या नात्याने प्रियकर आपल्या अपघाताने विकल झालेल्या प्रेयसीची इतकी काळजी वाहातो ही कहाणीच लोकविलक्षण आहे.
 
कथा -  
आरती या चित्रपटाची दिग्दर्शिका सारिका मेणे हिचा सख्खा भाऊ सनी पवार व सनीची मैत्रिण आरती मकवाना यांची वास्तव कथा आरती या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. २००६ सालची गोष्ट आहे. आरती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे सहलीला गेली होती. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती त्या गाडीला अपघात झाला. त्यात पुढच्या सीटवर बसलेल्या आरतीच्या मेंदूला मार लागला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर काही वेळ पुन्हा शुद्धीत आली. सनी व त्याच्या घरच्यांना आरतीच्या अपघाताबद्दल कळताच ते तातडीने भाईंदरला धावले. तिथे स्थानिक रुग्णालयात आरतीवर उपचार सुरु असताना आरती परत कोमात गेली. तिला जसलोक रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे ती सहा महिने कोमात होती. त्यावेळी सनी पवार हा रात्रंदिवस तिच्यासोबत होता. आरतीची मनोभावे शुश्रूषा करुन मैत्रीचे नाते निभावत होता. ती कोमातून त्यानंतर बाहेर आली तेव्हा तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता.
 
आरतीची अवस्था दोन वर्षांच्या बाळासारखी होती. अशा अवस्थेत ती सुमारे साडेतीन वर्ष जगली. त्या सर्व काळात सनी पवार तिच्या सोबत सावलीसारखा राहिला. आरतीवर उपचार चालू असताना तिच्या स्थितीबद्दल व तिची मनोभावे शुश्रूषा करणारा तिचा प्रियकर सनी या दोघांबद्दल वृत्तवाहिन्यांवरुन व वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या. त्यातून असंख्य व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक मदत मिळून आरतीवर एक मोठी शस्त्रक्रिया होऊ शकली. त्यानंतर तिला काही काळाने रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. त्यानंतरही आरतीची खूप काळजी सनी पवार घेत होता. या सगळ्या कालावधीत सनी पवारचे शिक्षण थांबलेले होते. अखेर आरतीची आई व  सनीचे आई-बाबा, कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितल्यामुळे तसेच समाजसेवा हेच आपले आयुष्य जगण्याचे ध्येय असल्याचे लक्षात आल्याने सनी पवारने एमएसडब्ल्यूला प्रवेश घेतला.
 
समाजसेवेचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन सनी पवारने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यालाच वाहून घेतले. आरतीच्या तब्येतीत काहीही सुधारणा होण्याची शक्यता नाही असे डॉक्टरांनी सनी पवारला स्पष्टपणे सांगितलेच होते. त्याप्रमाणे आजाराशी झुंजत असलेली आरती एक दिवस मरण पावली. आरतीच्या आजारपणाच्या साडेतीन वर्षात सनी पवारने एक प्रियकर, एक मित्र म्हणून त्याग केला तो अलौकिकच होता. आरती मकवाना व सनी पवारमध्ये जे सच्चे प्रेम होते त्याची गाथा म्हणजे हा चित्रपट आहे.
 
बातम्या आणखी आहेत...